Breaking News

पदोन्नतीच्या निर्णया विरुद्ध केज येथे रिपाइंचे तिव्र निदर्शने

गौतम बचुटे । केज   

मागास प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या निर्णया विरुद्ध केज येथे रिपाइं (आठवले गट) यांच्या वतीने तिव्र निदर्शने करण्यात आली.

मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतील पदोन्नती संदर्भात राज्यशासनाने निर्णय घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्या नुसार मंत्रिमंडळाच्या उपसमितीने निर्णय घेऊन ३३% जागा राखीव ठेवल्या होत्या. परंतु दि. ७ मे २०२१ रोजी राज्य शासनाने तडकाफडकी तो रद्द करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय म्हणजे मागास प्रवर्गातील कर्मचाऱ्यावर अन्याय करणारा आहे. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण आणि त्यांच्यात नैराश्य व भीतीचे वातावरण पसरले आहे. या राज्य सरकारच्याया निर्णयाचा निषेध ना. रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर करण्यात येत आहे. 

रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पूजी कागदे यांच्या आदेशानुसार आणि तालुका अध्यक्ष दिपक (भाऊ) कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आणि सरचिटणीस गौतम बचुटे, उपाध्यक्ष बाळसाहेब ओव्हाळ व विकास आरकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत केज तहसील कार्यालया समोर दि.४ जून शुक्रवार रोजी निदर्शने करण्यात आली. 

या वेळी कार्यकर्त्यांनी मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे आरक्षण रद्द करणाऱ्या निर्णया विरोधात घोषणाबाजी करीत प्रभारी तहसीलदार लक्ष्मण धस यांना मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनात मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण द्यावे यासह ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल न करून घेणे व त्यातील आरोपींना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांना सहआरोपी करा. ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाल्यास त्यांच्या विरुद्ध दरोडा आणि चोरीचे गुन्हे दाखल केले जातात त्याची सखोल चौकशी करून कार्यवाही करा. आणि मागासवर्गीय स्मशानभूमीवरील अतिक्रमणे हटवून कोरोना संकटात मागासवर्गीय व भूमिहीनांना आर्थिक मदत देण्याची मागण्या यांचा समावेश आहे.


No comments