Breaking News

ओबीसी आरक्षणाला स्थगिती आणणारा याचिकाकर्ता भाजपाचा हस्तक-कल्याण आखाडे


ओबीसीप्रश्नी भाजपाचे आंदोलन म्हणजे पुतना मावशीचा पान्हा

                    बीड :  ओबीसी आरक्षणप्रश्नी भारतीय जनता पार्टीकडून छेडण्यात येत असलेले आंदोलन म्हणजे पुतना मावशीचा पान्हा असून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षणाला स्थगिती आणणारा याचिकाकर्ता हा भाजपाचा हस्तक असल्याचा आरोप सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

 

               पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, शिशा तो टूटा है, लेकिन पत्थर  कहासे आया ! आरसा तर फुटला पण या घटनेच्या कटकारस्थानामागे कोण आहे याचा शोध घेऊन पर्दाफाश होणे गरजेचे आहे. न्युज एक्सप्लेनर व्हिडिओद्वारे झालेल्या एका चर्चेदरम्यानच्या संभाषणामध्ये याचिकाकर्ता विकास गवळी हा भारतीय जनता पार्टीचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते श्री.देवेंद्र फडणवीस यांचा पिद्दु असल्यासारखे त्यांची तळी उचलल्यागत वारंवार उल्लेख करीत आहे. यावरून याचिकाकर्ता हा तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसचा असला तरी हे कृत्य करण्यासाठी त्यास भाजपा नेत्यांचीच फूस असल्याचे तसेच तो भाजपाचा हस्तक असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. बहुजनांना म्हणजे बलुतेदार-आलुतेदार यांना सत्तेपासून वंचित ठेवा या आरएसएसच्या अजेंडयानुसार भाजपाचे धोरण आहे. एकीकडे ओबीसीचे आरक्षण रद्द करण्यासाठी छुप्या खोड्या करायच्या आणि दुसरीकडे ओबीसींचा पुळका असल्याचा आव आणून आंदोलन छेडण्याचे ढोंग भाजपा करीत आहे. परंतु हे न कळण्याइतपत ओबीसी आता दुधखुळा राहिला नाही हे भाजपाने लक्षात ठेवावे.  

                 वास्तविक पाहता याचिकाकर्ता विकास गवळीने नागपूर, अकोला, वाशिम, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यामध्ये होत असलेल्या अतिरिक्त आरक्षणाचा आक्षेप राज्य निवडणूक आयोगाकडे घेऊन त्यामध्ये आवश्यक दुरुस्ती करून घ्यायला हरकत नव्हती. परंतु सुधारणा करण्यासाठी नव्हे तर ओबीसी संपुष्टात यावे यासाठी हा कट रचण्यात आलेला आहे. 

                खंडीच्या वरणात घाण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तांत्रिकदृष्टया काँग्रेसमध्ये असलेला भाजपा हस्तक विकास गवळीची काँग्रेस पार्टीने पार्टीमधून अधिकृतपणे तातडीने हकालपट्टी करावी अशी मागणीही कल्याण आखाडे यांनी केली आहे.  


No comments