Breaking News

श्री संत ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूल बंद, विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान


शाळा प्रशासनाने आरटीई कायद्याचे उल्लघन करत शाळा बंद केल्याने विद्यार्थ्याचे शिक्षण बंद झाले

पालकांची जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या कडे तक्रार

आरटीई अंतर्गत मोफत प्रवेश मिळालेल्या गोरगरीब विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान करू नका अन्यथा तीव्र आंदोलन करू- मनोज जाधव

बीड :  बीड शहरातील शाहू नगर भागातील श्री संत ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूल शाळेने शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन करत पालकांना कसलीही पूर्व सूचना न देता शाळा प्रशासनाने शाळा बंद केली आहे. यामुळे या शाळेत शिक्षण हक्क कायद्या (आरटीई) अंतर्गत मोफत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आता आपल्या पाल्याचे भवितव्याचे काय असा प्रश्न पडला आहे. यामुळे या सर्व पालकांनी एकत्रित येत आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुमार साहेब यांना लेखी निवेदन देत आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या.

             संबंधित शाळेने गतवर्षी विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारचे शिकवणी दिली नाही. कोरना काळात ऑनलाइन शिक्षण पद्धती राबवण्यात आली होती. परंतु या शाळेने गत वर्षी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देखील दिले नाही. याउपर विद्यार्थ्यांना शाळेचे वह्या पुस्तकांची किट घेण्यास भाग पाडले ही शाळा मान्यता प्राप्त असून या शाळेची आरटीई पोर्टल ला नोंद आहे. या शाळेमध्ये आरटीई अंतर्गत मोठ्या प्रमाणात प्रवेश आहेत. शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत एकदा प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना १ ली ते ८ वी पर्यंतचे शिक्षण सक्तीचे आणि मोफत दिले जाईल असे स्पष्ट आहे. परंतु या शाळेने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन केले आहे. तसेच या शाळेत आरटीई अंतर्गत प्रवेश मिळालेल्या गोरगरीब  विद्यार्थ्यांना अधांतरी राहण्याची वेळ आली आहे. आता या गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क कायद्यांतर्गत मिळालेल्या मोफत शिक्षणापासून वंचित रहावे लागणार आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांची परिस्थिती अत्यंत गरीब आहे त्यामुळे त्यांच्या पालकांना आता आपल्या पाल्यांचे प्रवेश इतर शाळेमध्ये फी भरून करणे अशक्य आहे.

 त्यामुळे या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे. या प्रकरणात शिक्षणाधिकारी ( प्रा) यांना ३ मार्च रोजी लेखी निवेदन देण्यात आले होते  आणि वेळोवेळी तोंडी कल्पनादेखील दिली होती. मात्र यावर शिक्षण विभागाने कसल्या प्रकारची कारवाई केली नाही. तेव्हा या शाळेत आरटीई अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना या शाळेच्या प्रशासनाच्या वतीने चालवण्यात येत असलेल्या संत ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूल बार्शी रोड या शाखेत सामावून घेण्यात यावे किंवा या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची इतर शाळेत आरटीई अंतर्गत मोफत प्रवेशाची सोय करण्यात यावी. आणि या शाळेवर आणि शाळा प्रशासना वर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्ही या शाळेतील सर्व पालक लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन पुकारू असे पालकांच्या वतीने निवेदनात म्हंटले आहे. या वेळी सोनी चंद्रशेखर कामनोर, शिंदे गोरख बाबासाहेब, सुदामराव रवी डोळस, सुरेखा संभाजी ढेंबरे, रेखा रविंद्र करंजकर, शेख असद, कदम रमेश पंढरीनाथ, तिवारी गोंविद प्रकाश, पिव्हळ सुरेश राजेंद्र, वाघ राजेंद्र सिताराम, अनिल विठ्ठलराव पवार, गायकवाड विठ्ठल राजेंद्र, कापले सोमनाथ गोरखनाथ, शिला योगेश जोगदंड ,भास्कर शंकरराव कदम, पवार बाळु गोवर्धन, लखुटे रामप्रसाद जानवळे, शंकर उगले बळीराम, पौळ शाहु, अजय मिलानी, रामराव नागिशे, इलियास शेख आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सकारात्मक, मात्र शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

शाळा बंद झाल्या नंतर या सर्व पालकांनी एकत्रित येत दि. ३ मार्च रोजी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना लेखी निवेदन देण्यात आले होते. मात्र त्या निवेदनावर अद्याप काहीच कारवाई करण्यात आली नसून या वर काही ठोस उपाय योजना केली असती तर हा विषय मार्गी लागला असता. मात्र आज मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिल्या नंतर त्यांनी लागलीच शिक्षणाधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देत तात्काळ योग्य ती कार्यवाही करत या विद्यार्थ्याना कश्या प्रकारे न्याय देता येईल त्या संबंधी कारवाई करण्याचे सांगितले.


No comments