Breaking News

श्री संत ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूलचे पालक आक्रमक


शिक्षण उसंचालकांना निवेदन : आरटीई अंतर्गत मोफत प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचे समायोजन करण्याची मागणी

बीड :  बीड येथील शाहू नगर भागातील श्री संत ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूल प्रशासनाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने या शाळेत प्रवेशित विद्यार्थ्याचे तर मोठे नुकसान होणारच आहे. परंतु त्याही पेक्षा जास्त नुकसान या शाळेत आरटीई अंतर्गत मोफत प्रवेश मिळालेल्या गोरगरीब विद्यार्थ्याचे होणार आहे. या विद्यार्थ्याच्या पालकांना आता आपल्या पाल्याचे भविष्य अंधारमय दिसत असून आपल्या पाल्याना इतर शाळेत फी भरून शिकवणे शक्य नसल्याने आमच्या मुलांचे संबंधित शाळेच्या बार्शी रोड वरील शाखेत प्रवेश द्यावेत किंवा इतर शाळेत समायोजन करावे आणि या शाळा व्यवस्थापनावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी पालकांनी शिक्षण उप संचालक बीड मध्ये आले असता त्यांना निवेदनाद्वारे केली आहे.

 

      बीड शहरातील श्री संत ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूल  यांच्या व्यवस्थापनाने शाहूनगर भागात असणारी त्यांची शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे . यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले असून या शाळेतील आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी पाल्यांचे समायोजन मुख्य शाळेत करण्यात यावे किंवा इतर कोणत्याही शाळेत करण्यात यावे असे निवेदन बीड भेटीवर आलेल्या शिक्षण उपसंचालक यांना दिले आहे . 

विद्यार्थ्यांचे भविष्यातील होणारे नुकसान टाळण्यासाठी योग्य पाऊल् उचलण्याची मागणीही पालकांमधुन होत असून शाळा व्यवस्थापनाच्या निर्णयामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे .येणाऱ्या काळात आमच्या विद्यार्थ्यांचे समायोजन न झाल्यास आम्ही सर्व पालक रस्त्यावर उतरून आंदोलन उभा करू असा इशाराही पालकांनी दिला. या वेळी सोनी चंद्रशेखर कामनोर, शिंदे गोरख बाबासाहेब, सुदामराव रवी डोळस, सुरेखा संभाजी ढेंबरे, रेखा रविंद्र करंजकर, शेख असद, कदम रमेश पंढरीनाथ, तिवारी गोंविद प्रकाश, पिव्हळ सुरेश राजेंद्र, वाघ राजेंद्र सिताराम, अनिल विठ्ठलराव पवार, गायकवाड विठ्ठल राजेंद्र, कापले सोमनाथ गोरखनाथ, शिला योगेश जोगदंड ,भास्कर शंकरराव कदम, पवार बाळु गोवर्धन, लखुटे रामप्रसाद जानवळे, शंकर उगले बळीराम, पौळ शाहु, अजय मिलानी, रामराव नागिशे, इलियास शेख आदी पालक उपस्थित होते.

नियमांची पायमल्ली करत शाळेने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ मांडला - मनोज जाधव

एखाद्या व्यवसायात घाटा आला की व्यापाऱ्याने तो व्यवसाय बंद केलेला आपण पाहिले किंवा ऐकले आहे. परंतु आता फक्त लाभासाठी आणि नफेखोरीसाठी शिक्षणाचा बाजार मांडून सुरू केलेल्या शाळांनी शाळा घाट्यात आल्या असल्याचे सांगत शाळा बंद करण्याचा निर्णय घेत आहेत. शाळेची मान्यता घेतेवेळी  शिक्षण हक्क कायद्यानुसार कोणतीही शाळा किंवा संस्था यांना कोणत्याही व्यक्तीच्या लाभासाठी किंवा हितासाठी शाळा चालवता येणार नाही. असे स्पष्ट नमूद केलेले असताना आणि आरटीई प्रवेश देणे आम्हास मान्य आहे असे लिहून दिल्यासच शाळेला मान्यता मिळते मग असे असताना शाळा व्यवस्थापन यांनी या सर्व नियमांची पायमल्ली करत विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ मांडला आहे. असे मत आरटीई कार्यकर्ते तथा शिवसंग्रामचे युवा नेते मनोज जाधव यांनी व्यक्त केले. 


No comments