Breaking News

दिड वर्षात दगडवाडी आणि खजेवाडीत कोरोनाचा एकही रुग्ण नाही


कौतुकास्पद : शासनाच्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन करून ग्रामस्थांनी कोरोनाला वेशीबाहेरच रोखले

शिवाजी भोसले । अंबाजोगाई 

 कोरोना संसर्गामुळे अख्खं जग अडचणीत आले असतांना अंबाजोगाई तालुक्यातील दगडवाडी आणि खजेवाडी या दोन गावांनी गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाला वेशीबाहेर रोखण्याचा भीम पराक्रम करुन दाखवला आहे. यामुळे प्रशासनाकडून देखील ग्रामस्थांचे कौतुक करण्यात येत आहे.

सध्या कोरोनामुळे होत असलेले मृत्यू, ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता व दवाखान्यातील बेडच्या तुटवड्याची देशभर चर्चा आहे. कोरोनाला रोखणे जगासमोर हे एक मोठे आव्हान निर्माण झाले आहे. संसर्ग कमी करण्यासाठी व नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी सरकार अब्जावधी रुपये खर्च करत आहे. कोरोना संसर्गामुळे अख्खं जग अडचणीत आले असताना देखील तालुक्यातील दगडवाडी आणि खजेवाडी येथील ग्रामस्थांनी गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाला वेशीबाहेर रोखायचा पराक्रम करुन दाखवला आहे. सरकारी नियमांचे तंतोतंत पालन, स्वच्छता आणि प्रबोधन या त्रिसुत्रीमुळे गेल्या दीड वर्षात पाचशेच्या आत लोकसंख्या असलेल्या या गावातील एकालाही बाधित करायचे धाडस कोरोनाने केले नाही किंवा ग्रामस्थांनी तशी संधीच कोरोनाला मिळू दिलेली नाही. ही किमया दगडवाडी आणि खजेवाडी या गावाने साधली आहे. या गावाने निसर्गावर एवढे अमाप प्रेम केल्याने गावात २४ तास शुद्ध हवा, पक्ष्यांचा किलबिलाट असे निसर्गरम्य चैतन्यमयी वातावरण असते.अशी घेतली जाते काळजी

कोरोनाचा धोका सुरु झाल्यापासून ग्रामस्थांनी कोरोना म्हणजे काय ? याची माहिती करुन घेतली आणि शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन सुरु केले. गावात प्रत्येकाच्या तोंडावर मास्क दिसतो, प्रत्येक जण सोशल डिस्टन्सचे पालन करताना दिसतो. नेहमीप्रमाणेच ग्रामस्थ शेतात कामं करतात. योग्यरितीने सॅनिटाईज करुन किराणा व इतर सामानाचा वापर होतो. रोज दुध, ताजी फळे, भाजीपाला गावातच मिळतो. त्यामुळे सकस ताजा आहार, शुद्ध हवा आणि कोरोना नियमांचे पालन यामुळे दगडवाडी आणि खजेवाडी येथील ग्रामस्थांनी कोरोनाला गावात एन्ट्रीच करु दिलेली नाही. ग्रामीण भागातील इतर गावांनी याचा आदर्श घेतल्यास गावाला कोरोना फ्री बनवणे शक्य होईल.

बाहेरील लोकांना प्रवेशबंदी

ग्रामपंचायतीने गावा बाहेरील लोकांना प्रवेशबंदी केली. आवश्यक वाटल्यास थोड्यावेळासाठी परवानगी दिली. करोनाविषयी जागृती केली. सुरक्षित अंतर, मास्क वापरणे आदी मूलभूत नियम पाळण्यात आले. अशी माहिती दगड वाडीचे सरपंच गंगाबाई कुंडगर व माजी सरपंच मारोती तुकाराम खांडेकर यांनी दिली.

दिड वर्षापासून सार्वजनिक कार्यक्रम बंद

खजेवाडी हे अवघ्या दोनशे लोकसंख्येचे गाव आहे. येथील ग्रामस्थ सांगितलेल्या गोष्टीचे काटेकोर पालन करतात. वास्तविक ग्रामस्थ सांगितलेल्या गोष्टीचे काटेकोर पालन करतात. वास्तविक पाहता हे गाव सांप्रदायिक आहे. तरीसुद्धा गेल्या दीड वर्षांपासून कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम अथवा भजन, कीर्तन, सप्ताह अशी धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले नाहीत. युवक अमोल खजे व त्यांचे मित्र यांनी गावामध्ये जनजागृती केली. विशेष बाब म्हणजे ग्रामस्थ कुठल्याही सार्वजनिक ठिकाणांचा वापर करत नाहीत. पाणी भरण्यासाठी सुद्धा सार्वजनिक हात पंपाचा वापर करत नसून प्रत्येकाच्या घरी नळाद्वारे पाणी येते. स्वच्छता पाळली जाते.कोरोनाला दूर ठेवण्यासाठी सर्व बाबींचे तंतोतंत पालन करण्यात येते. अशी माहिती उपसरपंच निलेश पाटील यांनी दिली.ग्रामस्थांचे कौतुक वाटते

कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत संसर्ग थांबविण्यासाठी नागरिकांनी स्वतः शिस्त पाळली पाहिजे. सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर आणि स्वच्छता ठेवावी. खजेवाडी आणि दगडवाडी येथील ग्रामस्थांचे खरोखर कौतुक वाटते.

 - शरद झाडके, उपजिल्हाधिकारी

दगडवाडी आणि खजेवाडीचा आदर्श इतरांनी घ्यावा

ग्रामीण भागातील नागरिकांना कोरोनाला दूर ठेवणे सहज शक्य आहे. प्रत्येकाने स्वतःची काळजी घेतली पाहिजे. शासनाने घालून दिलेल्या नियम, अटी व शर्तीचे काटेकोर पालन करावे. दगडवाडी आणि खजेवाडी येथील ग्रामस्थांचा आदर्श इतर ग्रामस्थांनी घ्यावा आणि आपलेही गाव कोरोना मुक्त करावे. 

विपीन पाटील, तहसीलदार 


No comments