Breaking News

विशाल कुलथे खुनखटला प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालविण्याची शिरूर व्यापारी संघाची मागणी

शिरूर कासार : शहरातील तरुण सराफा व्यापारी विशाल कुलथे यांची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे.या प्रकारामुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली असून सराफा व्यापाऱ्यांसह इतर सर्व व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.सदरील खुनखटला फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा अशी मागणी शिरूर तालुका व्यापारी संघाच्या वतीने करण्यात आली आहे.तालुक्याच्या आजपर्यंतच्या इतिहासात असा काळा दिवस कधीच उगवला नव्हता.शहरातील व्यापारी हे आपापल्या पद्धतीने त्यांचा व्यावसाय करून उपजीविका भागवत असून त्यांच्या विरुद्ध ग्राहकांची किंवा इतर कोणत्याही व्यक्तीची एकही साधी तक्रार आतापर्यंत कुठेही दाखल झालेली नाही.

तालुक्यातील अठरापगड जातीचे व्यापारी शहरात आपला व्यावसाय करून आपली प्रगती साधत असून कोणालाही दुखावण्याचे काम त्यांच्याकडून कधीच झालेले नाही.अशा परिस्थितीत व्यावसायाच्या नावाखाली दोन-चार वर्षांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील भातकुडगांव येथून आलेल्या ज्ञानेश्वर उर्फ भैया गायकवाड याने सोने खरेदीचा बहाणा करून सराफा व्यावसायिक विशाल कुलथे यांना आपल्या महाकाल नामक हेअर सलून दुकानात बोलावून घेत धीरज मांडकर आणि केतन लोमटे या सहकाऱ्यांच्या मदतीने गळा दाबून तसेच तोंडात कात्री खोपसून निर्दयपणी हत्या केली आहे.हा प्रकार क्रूरतेचा कळस असून माणुसकीला काळिमा फासणारा आहे.

या प्रकरामुळे व्यापारी भयभीत झाले असून अगोदरच लॉकडाऊनचा काळ सुरू असताना त्यातच असा प्रकार घडल्यामुळे व्यापारी प्रचंड तणावाखाली आलेले आहेत.तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नेहमीच प्रशासनाला मदत करणाऱ्या व्यापाऱ्यांवर भविष्यात अशी दुर्दैवी वेळ येवू नये त्यासाठी आरोपींना कडक शासन होणे गरजेचे आहे.म्हणून सराफा व्यापारी विशाल कुलथे खूनखटला प्रकरण हे फास्टट्रॅक (जलदगती न्यायालयात) चालविण्यात येऊन सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे व्यापारी संघाचे अध्यक्ष बबनराव ढाकणे यांच्यासह उपाध्यक्ष तुकाराम काळे,सचिव अजिनाथ सूर्यवंशी,किरण देसारडा,महेश डोंगरे,प्रविण कापरे,राजू खामकर,माऊली काटकर,दिगांबर भांडेकर,हनुमान जाधव,अनवर पठाण,अमर माळी,महेश उटे,मोहन गायकवाड यांच्यासह व्यापाऱ्यांनी केली आहे.  

No comments