Breaking News

शिरूर तालुक्यामध्ये मे महिन्यात ५ बालविवाह रोखण्यात चाईल्ड लाईन व बाल संरक्षण समितीला यश

बाळकृष्ण मंगरुळकर । शिरूर कासार

शिरूर कासार तालुक्यात या मे महिन्याच्या २० तारखे पर्यंत विविध गावात होणारे  एकूण पाच बालविवाह रोखण्यात तालुका बाल संरक्षण समिती,चाईल्ड लाईन, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व पोलीस प्रशासनाला यश मिळाले आहे अशी माहिती तालुका बाल संरक्षण समितीचे सदस्य समीर पठाण यांनी दिली आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, सध्या कोविड १९ या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले असून त्याला प्रतिबंध घालणेसाठी जिल्हाभरात लॉकडाऊन व जमावबंदीसह अनेक निर्बंध लावलेले आहेत याचाच गैरफायदा घेऊन ग्रामीण भागातील लोक हे आपल्या अल्पवयीन मुलींचे बालवयातच त्यांच्या इच्छे विरुद्ध कोणालाही माहिती न होऊन देता गुपचुप विवाह लावून देत असल्याच्या घटना जिल्ह्यात घडत आहेत.

अशाच पद्धतीने शिरूर तालुक्यातील बडेवाडी येथील एका १७ वर्षीय मुलीचे व एका १५ वर्षीय मतिमंद असणाऱ्या मुलींचे विवाह हे त्यांचे इच्छे विरुद्ध लावून देण्याची तयारी करण्यात आली होती परंतु त्यातील एका मुलीने चाईल्ड लाईनच्या १०९८ या हेल्पलाईन क्रमांकावर व लेकलाडकी अभियान कडे या बाबतीत माहिती दिल्याने रोखण्यात आले व त्याच बरोबर तालुक्यातील शिरापूर गात येथील १३ वर्षीय व कान्होबाचीवाडी येथील १२ वर्षीय दोन मुलींचे होणारे बालविवाहाची माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बाल संरक्षण समितीस व चाईल्ड लाईन यांना प्राप्त झाल्याने ते देखील बाल विवाह हे दिनांक १९ मे रोजी कुटुंबातील सर्व सदस्य यांचे समुपदेशन करून व बाल विवाहानंतर चे होणारे नुकसान आणि दुष्परिणाम या बाबत माहिती देऊन थांबवण्यात आले संबंधित मुलींच्या पालकांनी देखील आम्ही मुलींचे १८ वर्ष पूर्ण झाल्याशिवाय लग्न करून देणार नाहीत असे जबाब हमीपत्र लिहून देत मुलींना पुढील शिक्षण देण्याची पूर्ण तयारी दर्शवली आहे. 

या प्रमाणे मे महिन्याच्या २० तारखे पर्यंत तालुक्यातील विविध गावात होणारे एकूण ५ बाल विवाह हे थांबवण्यात यश मिळाले आहे. सदरची कारवाई ही  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी  व्ही. एम.हुंडेकर व तहसीलदार श्रीराम बेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण कक्ष प्रतिनिधी बाजीराव ढाकणे,बाल संरक्षण कक्ष प्रतिनिधी स्वप्नील कोकाटे, चाईल्ड लाईन प्रकल्प समन्वयक रामहरी जाधव, टीम मेंबर अश्विनी जगताप, तालुका बाल संरक्षण समितीचे सदस्य समीर पठाण, बाल विकास प्रकल्प अधिकारी महादेव जायभाये, अंगणवाडी पर्यवेक्षिका करपे मॅडम,संबंधित अंगनवाडी सेविका, ग्रामसेविका खेडकर मॅडम, शिरापूर चे ग्रामसेवक, शिरूर पोलीस स्टेशनचे स.पो.नि.पवार, स.पो.उ. नि. भागवत सानप,पो.कॉ. सोमनाथ जायभाये, यांनी केली आहे यावेळी बबनराव मोरे,अक्षय मोरे व आदी उपस्थित होते.

यावेळी पालकांनी आपल्या मुला मुलींना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याची क्षमता निर्माण करून द्यावी व मुलीचे वय हे १८ वर्ष व मुलाचे वय २१ वर्ष पूर्ण झाल्यानंतरच त्यांचे विवाह करून द्यावेत कमी वयात बालविवाह लावून देऊन त्यांचे शारीरिक, व मानसिक आरोग्यचे तसेच शैक्षणिक भविष्याचे नुकसान करु नये असे घडत असल्यास मुला मुलींनी चाईल्ड लाईनच्या १०९८ या मोफत क्रमांकावर तसेच बाल संरक्षण समितीकडे संपर्क साधावा असे आवाहन  बाल संरक्षण समितीचे सदस्य समीर पठाण यांनी केले आहे. 

No comments