Breaking News

परळी उपजिल्हा रूग्णालय ते अंबाजोगाई स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालय बससेवेला प्रारंभ आरोग्य मित्र आणि राधा-मोहन साथी प्रतिष्ठानचा उपक्रम

 

परळी :  शहरातील आणि तालुक्यातील रूग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयात जाता यावे यासाठी परळीतील उपजिल्हा रूग्णालय ते थेट अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालय बससेवेला आज प्रारंभ करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत आरोग्य मित्र आणि राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचा शुभारंभ उपजिल्हा रूग्णालयात करण्यात आला.

अंबाजोगाईचे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय हे अतिशय सुविधांनी परिपूर्ण आणि सुसज्ज असे रूग्णालय आहे. या रूग्णालयात शेकडो प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार केले जातात. त्याचबरोबर एक्स-रे, सोनोग्राफी, सिटी स्कॅन, डिजीटल एक्स-रेसह विविध प्रकारच्या रक्तचाचण्याही केल्या जातात. रूग्णांच्या दृष्टीने हे रूग्णालय संजीवनी देणारे तर ठरत आहेच. 

परंतू सर्वसामान्यांसाठी ते वरदानही आहे. हीच बाब लक्षात घेता रूग्णांना उपचार घेण्यासाठी तसेच दाखल असलेल्या रूग्णांच्या भेटीला त्यांच्या नातेवाईकांना जाता यावे यासाठी आरोग्य मित्र व राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने परळी उपजिल्हा रूग्णालय ते अंबाजोगाई स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालय अशी बससेवा सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक दिवशी या बस सकाळी १०, दुपारी ०१ व दुपारी ०४ वाजता परळी येथील उपजिल्हा रूग्णालयातून निघतील तर अंबाजोगाई येथून परत येण्यासाठी याच बस एका तासाच्या फरकाने म्हणजेच स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयातून सकाळी ११, दुपारी ०२ व दुपारी ०५ वाजता परळीच्या दिशेने रवाना होतील. या बससेवेमुळे रूग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची टप्प्या टप्प्याने प्रवासामुळे होणारी गैरसोय दूर होऊन कमी पैशात थेट प्रवास करता येणार आहे. त्यामुळे हा उपक्रम नागरीकांसाठी अत्यंत फायदेशिर आणि स्तुत्य असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

आरोग्य मित्र आणि राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने परळी वैजनाथ ते स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालय बससेवेच्या उद्‌घाटन प्रसंगी आरोग्य मित्रचे प्रदेशाध्यक्ष चंदुलाल बियाणी, राजस्थानी मल्टीस्टेटचे उपाध्यक्ष बालचंद लोढा, जेष्ठ नेते माधव ताटे, जमिल अध्यक्ष, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख प्रा.अतुल दुबे, प्रितम जाधव, पत्रकार संभाजी मुंडे, दत्तात्रय काळे, वैजनाथ कासार, विकास वाघमारे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. उद्‌घाटन प्रसंगी अनेकांची आपले मत व्यक्त केल्यानंतर लागलीच प्रवाशांना घेवून बस अंबाजोगाईच्या दिशेने रवाना करण्यात आली. 


No comments