Breaking News

शिकविलेच नाही तर शैक्षणिक शुल्क का भरायचे? दीड वर्षांपासून कोरोनाची ड्युटी सुरूच; शैक्षणिक शुल्क माफ़ीसाठी मार्डची निदर्शने

शिवाजी भोसले । अंबाजोगाई  

  वैद्यकीय अभ्यासक्रमाचे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांना गेल्या दीड वर्षांपासून शिकविलेच नाही. उलट पदव्युत्तर विध्यार्थीच दीड वर्षांपासून कोरोना वार्डात रुग्णसेवा देत आहेत. आम्हाला शिकविलेच नाही तर शुल्क का भरायचे? असा सवाल निवासी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेने केला आहे. या मागणीसाठी त्यांनी निदर्शने केली.

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारे ११९ निवासी डॉक्टर आहेत. गेल्या दीड वर्षांपासून या डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासुन हे सर्व डॉक्टर कोरोना कक्षात रुग्णसेवा देत आहेत. या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विध्यार्थ्याचा अभ्यासक्रम ही पूर्ण झालेला नाही. अशा स्थितीतही या विध्यार्थ्यांकडून शासन लाख रुपये शैक्षणिक शुल्क वसूल करीत आहे. हे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे. या मागणीसाठी मार्ड च्या वतीने रुग्णालय परिसरात निवासी डॉक्टरांनी निदर्शने करून आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.

  या आंदोलनात मार्ड चे अध्यक्ष डॉ. सुमित साबळे, सचिव डॉ. विद्या लावंड, सचिव डॉ. केदार कुटे, डॉ. दत्ता चिकटकर, डॉ. श्रीधर आघाव, डॉ. केतकी स्वामी, डॉ. कविता सानेर, डॉ. मयुरी राठोड, डॉ. शुभांगी दिलपाके, डॉ. पूजा पाटील, डॉ. उमेश सावजी, डॉ.प्रशिक भगत, डॉ. सायमा, डॉ. अंकिता हंगरगेकर, डॉ. प्रिया उमरे, डॉ. संपदा जवरे, डॉ. शेखा सुब्बा यांच्यासह निवासी डॉक्टर या आंदोलनात सहभागी झाले होते.


No comments