Breaking News

सोने खरेदीचा बहाणा करून सोनाराची केली हत्या !

गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने केले वार, पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह शेवगावमध्ये पुरला

शिरुर पोलिस ठाण्यात सोनार बेपत्ता असल्याची होती नोंद

दोन हत्यारांना पोलिसांनी केली अटक, शिरुरसह शेवगामध्ये खळबळ

बाळकृष्ण मंगरुळकर । शिरुर, का. 

शिरुर कासार येथील एका सोनाराला सोने खरेदीचा बहाणा करून  बोलावून घेण्यात आले. त्यानंतर तीक्ष्ण हत्याराने सोनाराच्या गळ्यावर वार करून त्याची हत्या करण्यात आली. यानंतर खुनाचा गुन्हा उघड होऊ नये, म्हणून आरोपींनी मृतदेह शेवगाव तालुक्यातील भाटकूडगाव मधील एका शेतात पुरला. ही घटना रविवारी उघड झाल्यानं शिरुर कासारसह शेवंगावमध्ये एकच खळबळ उडाली असून दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. 

मिळलेल्या माहितीनुसार शिरूर कासार पोलीस ठाण्यात सोनार विशाल सुभाष कुलथे (वय२५) हा बेपत्ता असल्याची गुरुवारी (दि.२०) नोंद करण्यात आली होती. त्यानुसार बेपत्ता असलेल्या विशालचा शोध पोलिस घेत असताना गुप्त खब-यामार्फत माहिती मिळाली की, शेवगाव तालुक्यातील भातकुडगांव येथील ज्ञानेश्वर गायकवाड याचे शिरूर कासार येथे सलूनचे दुकान असून याच दुकानात सोनार विशाल याचा खुन करण्यात आल्याची माहिती समोर आली. अधिक चौकशी केली असता त्याचा साथीदार केतन सुभाष लोमटे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. केतन लोमटे याने अगोदर उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्याला पोलीस खाक्या दाखवताच तो पोपटा सारखा बोलु लागला, व गुन्ह्याची कबूली देत ज्या ठिकाणी मृत्यूदेह पुरण्यात आला, ते ठिकाण त्याने पोलिसांना दाखविले. 

शेवगांव तालुक्यातील भातकुडगांव येथील गट नंबर ४२९/१/१ मधील दत्तात्रय हरिभाऊ गायकवाड यांच्या शेतात मृत्यूदेह लांबी चार बाय रुंदी तीन खोली फुटाचा खड्डा खोदून पुरून या खुनाच्या घटनेचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला. ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड याचे शिरूर कासार येथे सलूनचे दुकान असल्याने त्याने सोने खरेदीचा बहाना करून सोनार विशाल सुभाष कुलथे यांच्याशी संपर्क केला. माझे लाॅकडाऊनमध्ये लग्न असून त्यामुळे जास्त सोन करायचे आहे, असे सांगून आ‌ॅर्डर देण्यात आली. ऑर्डर प्रमाणे  सोने माझ्या दुकानात येण्यास ज्ञानेश्वर गायकवाड याने सांगितले. त्याप्रमाणे सोनार विशाल याने सोने घेवून ज्ञानेश्वर गायकवाड याच्या सलुन दुकानात गुरुवारी (दि.२०) आला, आणि त्याच ठिकाणी त्याचा घात झाला. दरम्यान शेवगाव पोलीस आणि शिरूर कासार पोलिस यांनी घटनास्थळी जावून पाहणी केल्यानंतर त्याठिकाणी मृतदेह आढळून आला असून पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृत्यूदेह रुग्णालयात पाठविण्यात आलाय. आरोपी केतन लोमटे, शिवाजी गायकवाड या दोघांना पोलिसांनी अटक केली असून ज्ञानेश्वर गायकवाड मात्र फरार असल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक सिध्दार्थ माने यांनी सांगितले.

No comments