Breaking News

जगाचा पोशिंदा उगाच नाही म्हणत....! कोळवाडी येथील युवा शेतकऱ्यांने सर्पराज्ञी वरील प्राण्यांना व अजोळ प्रकल्पावरील वृद्धांना दिली कलिंगडाची भेट

बाळकृष्ण मंगरुळकर । शिरूर कासार 

तालुक्यात नवनवीन प्रयोग करण्यात आता शेतकरी कचरत नसून तोटा येऊ अथवा नफा प्रयोगशील शेती करायची असा विडाच युवा शेतकऱयांनी उचलला असून कोळवाडी येथील युवा शेतकरी प्रवीण चव्हाण याने पुणे येथील आपली कंपनीची नौकरी सांभाळून आपल्या कुटुंबाच्या मदतीने आपल्या १५ गुंठे क्षेत्रावर कलिंगडाची लागवड केली कलिंगड देखील अपेक्षे पेक्षा जास्त लगडली मात्र कडक ऊन व कडक लॉकडाऊनमुळे उत्पन्न येऊनही वेळेत विक्री न करता आल्याने आपला खर्च निघाल्या नंतर तागडगाव येथील सर्पराज्ञी प्रकल्पावरील मातृत्वापासून दुरावलेल्या व जख्मी आजारी असलेल्या प्राण्यांना व राक्षसभुवन तांबा येथील अजोळ प्रकल्पातील वृद्धांना या कलिंगडाचा आस्वाद द्यावा अशी कल्पना सुचली व ती अमलात आणली,आपणही समाजाचे काही देणे लागतो सारं काही आपलेच नसते ही भावना ठेवल्याने या "शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा उगाच म्हणतं नाही" ही उक्ती तंतोतंत खरी झाल्याचा प्रत्येय आला.


स्वतः पुणे येथील एका कंपनीत नौकरीला असूनही शेती ही आपली जननी असून तिच्यात चांगली मेहनत घेतल्यास ती पण चांगला आधार होऊ शकते म्हणून या युवा शेतकऱ्यांने मॅक्स या जातींचे बियाणे घेऊन ठिबक व मल्चिंगचा साह्याने आपल्या पंधरा गुंठे क्षेत्रावर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात लागवड केली मुख्यतः शेण खत व पाणी यांचे नियोजन करून अवघ्या २५ हजाराच्या खर्चात मे च्या पाहिल्या आठवड्यातच प्लॉट तोडणीला आला अपेक्षे पेक्षा जास्त फळ धारणा झाली असून फळ ही मोठं मोठी लगडली.


पिकवणे आपल्या हातात मात्र कोरोना मुळे लॉकडाऊन पडल्याने बाहेरील व्यापारी इकडे फिरकू शकले नाही व वेळेचे बंधन असल्याने स्थानिक बाजारात अपेक्षित विक्री झाली नाही त्यातचं दुष्काळात तेरावा महिन्या प्रमाणे  ऐन मे चे कडक ऊन असल्याने उत्पन्न भरगोस येऊनही अंदाजे जवळपास दीड लाख रुपये किमतीची फळे जाग्यावर सडू देण्यापेक्षा कुणाच्या तरी मुखात जातील म्हणून आमच्याच परिसरातील प्राण्याची नि स्वार्थ सेवा करणारे सर्पराज्ञी प्रकल्पाचे सिद्धार्थ व सृष्टी यांच्या कार्याच्या बातम्या वाचून प्रभावित झाल्याने मी त्या प्राण्यांना कलिंगड देण्याचा निर्णय घेतला व राक्षसभुवन येथील आमचाच मित्र समवयस्क कर्ण तांबे यांच्या कार्याला आपला हातभार म्हणून अजोळ प्रकल्पात असणाऱ्या आजोबांसाठी कलिंगड देऊन आपणही समाजाचे देणे लागतो म्हणून यावेळेस नफा नाही मिळाला म्हणून हताश न होता यांच्या आनंदात सहभागी होऊन आनंद घेतल्याने नफ्या पेक्षाही जास्त आनंद मिळाल्याचे प्रवीण चव्हाण यांनी सांगितले.नियोजनबद्ध शेती केल्याने जास्त नफा नाही मिळाला तरी तोटा होत नाही --- प्रवीण रामचंद्र चव्हाण, कोळवाडी

युवा शेतकऱ्यांनी हताश न होता शेतीत नवं नवीन प्रयोग करणे अपेक्षित आहे. शेती कधीच तोटा देत नाही मात्र आपण पारंपरिक शेती न करता नवे प्रयोग करून योग्य नियोजन केलं तर शेती जास्त नफा नाही दिला तरी तोटा मात्र होत नाही प्रत्येक वेळी नफ्याची अपेक्षा न करता आपला खर्च व कष्टाचे मोल जरी निघाले तरी समाधान मानावे. 
No comments