Breaking News

केज तालुक्यात दोन ठिकाणी विज पडल्याने गाई व म्हशी चा मृत्यू ; अवकाळी पावसामुळे अंब्याचे ही झाले नुकसान


गौतम बचुटे । केज 

केज शहरासह तालुक्यात रविवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यात दोन ठिकाणी विज पडल्याने शेतात बांधलेल्या गाई व म्हशीचा मृत्यू झाला आहे अवकाळी पावसामुळे आंब्याचे ही नुकसान झाले असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.

केज शहरासह तालुक्यात रविवारी दुपारी दोन वाजता जोरदार वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह मेघ गर्जना करत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. जवळ पास अर्धा तास जोरदार पाऊस झाल्याने शेतात सर्वत्र पाणी साचले होते तर शहरातील रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. रविवारी झालेल्या पावसात तालुक्यात दोन ठिकाणी विज पडल्याने गाई चा व म्हशीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे तालुक्यातील लाडेवडगाव येथील विष्णू ज्ञानोबा लाड  यांची गट नं.५० मध्ये असलेली गाय वीज पडून मरण पावली आहे. तर मोटेगाव येथील भाऊराव विठोबा पौळ  यांची सर्वे नं. ९ मध्ये झाडाला बांधलेली म्हैस वीज पडून मरण पावली असल्याची माहिती नायब तहसिलदार सचिन देशपांडे यांनी दिली आहे.

दरम्यान अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतातील आंब्याचे व शेतातील मका पिकाचे नुकसान झाले असल्याची माहिती अरुण करपे या शेतकऱ्याने दिली आहे. रविवारी दुपारी अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणातील उकाडा कमी झाला होता.

अवकाळीचा नांगरणी केलेल्या शेतीस फायदा

रविवारी जोरदार झालेल्या अवकाळी पावसाचा फायदा हा नांगरणी केलेल्या शेतीस झाला आहे अवकाळी पावसामुळे   शेतात नांगरणी केल्या नंतर निघालेले मातीचे ढेकळे या पावसात भिजल्याने शेतात मोगडणीचे काम सुलभ होणार असल्याचे अरुण करपे या शेतकऱ्याने सांगितले.


No comments