Breaking News

मंगेश भोले व त्यांच्या गृहिणी असलेल्या पत्नीने वर्दीची शान वाढविली


पोलीस नाईक मंगेश भोले यांचा पत्रकार संघाच्या वतीने सत्कार

गौतमबचुटे । केज 

वडीलांच्या अंत्याविधीसाठी  मोटार सायकलने औरंगाबादहून केजकडे येत असलेल्या कुटुंबाचा गेवराई जवळील गढी फाट्या जवळ अपघात झालेला दिसताच त्यातील जखमींना केज पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले मंगेश भोले व त्यांची पत्नी सौ. कोमल भोले यांनी मदत केली होती. त्या बद्दल भोले दांपत्याचा केज पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

या बाबतची माहिती अशी की, कोरेगाव येथील रामभाऊ शिनगारे यांचे दि. ११ मे रोजी वृद्धापकाळाने दुपारी १२:०० वा. निधन झाले होते. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच औरंगाबाद येथील रांजणगाव येथे राहत असलेली त्यांची मुलगी सौ. वंदना व जावई व्यंकट सरवदे हे लॉक डाऊन असल्यामुळे गाड्या बंद असल्याने मोटार सायकलवर बसून अंत्यविधीसाठी  केज तालुक्यातील कोरेगावकडे येत होते. त्यांनी दुपारी गेवराई ओलांडून गढी फाट्यावर आले. त्या वेळी मोटार सायकलच्या मागच्या टायर मध्ये खिळा घुसला आणि त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते पती-पत्नी रस्त्यावर पडले या अपघातात सौ. वंदना सरवदे हिच्या डोक्याला आणि पायाला मार लागला व रक्तस्त्राव झाला. रस्त्याने येणारे लोक हा अपघात पाहून पुढे जात होते. परंतु त्यांच्या मदतीला कोणीच पुढे आले नाही. एवढ्यात एका अज्ञात व्यक्तिने अपघातग्रस्त सरवदे यांच्या मोबाईलवरून त्यांचे पाहुणे पत्रकार गौतम बचुटे यांना अपघाताची माहिती दिली.

केज पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी मंगेश भोले हे त्यांची पत्नी सौ. कोमल भोले व मुलांसह औरंगाबादहून केजकडे येत होते. त्यांनी अपघात पहाताच अपघातातील जखमी सौ. वंदना व व्यंकट सरवदे यांना त्यांनी गढी फाट्यावरील डॉ. मुळे यांच्या दवाखान्यात घेऊन जाऊन उपचार केले तसेच त्यांच्यावर मलपट्टी करून डोक्याच्या जखमेवर टाके घेऊन सलाईन संपे पर्यंत भोले हे दवाखान्यात थांबून त्यांनी जखमींची सेवासुश्रुषा केली. त्यांना दवाखान्यातून सुट्टी होताच त्यांना त्यांच्या स्कार्पिओ गाडीत घेऊन आले आणि त्यांना कोरेगाव येथे आणून सोडले.

या भोले कुटुंबाच्या कार्याची दखल केज पत्रकार संघाने घेत पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली दि.१६ मे रोजी त्यांचा केज येथील विश्रामगृह सत्कार केला. या वेळी पत्रकार विजयराज आरकडे म्हणाले की, मंगेश भोले आणि त्यांची पत्नी सौ. कोमलताई भोले यांनी खऱ्या अर्थाने पोलिसांच्या खाकी वर्दीची शान राखली व सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्याची इज्जत वाढविली. यावेळी सत्काराला उत्तर देताना भोले म्हणाले की, संकटातील व्यक्तीना मदत करणे हे प्रत्येकाचे काम असून अपघातातील जखमीस प्रथमोपचार किंवा वैद्यकीय मदत करायला हवी. या वेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक सोनवणे, विजयराज आरकडे, दत्तात्रय हंडीबाग, महादेव काळे, दादासाहेब ढाकणे, प्रदीप साखरे, शेख वाजेद आणि गौतम बचुटे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन गौतम बचुटे यांनी तर आभार प्रदीप साखरे यांनी व्यक्त केले. 






No comments