Breaking News

अंगावर थुंकल्याच्या कारणावरून दुचाकीस्वाराला रस्त्यात अडवून लुटले

गौतम बचुटे । केज 

रस्त्याने प्रवास करीत असलेल्या मोटार सायकल स्वारास अंगावर थुंकल्याच्या कारणा वरून स्कुटी आडवी लावून वाटमारी करून एक मोबाईल व खिशातील पैसे काढून घेत मारहाण केल्याची घटना घडली आहे.

या बाबतची माहिती अशी की, गौतम ज्ञानोबा भालेराव हे दि. १० मे सोमवार रोजी रात्री १:१०० वा. च्या दरम्यान धारूर तालुक्यातील चोरंब्याकडे मोटार सायकलवरून जात होते त्यावेळी कासारी पाटीच्या पुढे तांबवा हद्दीत एका काळ्या स्कुटीवरून प्रवास करणाऱ्या तिघांनी त्यांना स्कुटी आडवी लावून, 'तू आमच्या अंगावर का थुंकलास ?" या कारणावरून चापट बुक्यांनी मुकामार दिला. तसेच त्यांच्या खिशातील रोख ५ हजार ७०० रु. आणि रिअल-मी कंपनीचा मोबाईल असे एकूण १२ हजार ७०० रु. चा मुद्देमाल वाटमारी करून लुटून नेला. 

त्या तिघांपैकी दोघे २० ते २५ वर्षे वयाचे होते. त्या पैकीं एकाने पांढऱ्या रंगाचा चैकडी शर्ट व पांढऱ्या रंगाची पॅंट तर दुसऱ्याच्या अंगात तपकिरी रंगाचा टी-शर्ट आणि काळी पँट व तिसरा हा १५ ते १६ वर्ष वयाच्या तरुणांच्या अंगात काळा शर्ट व काळी पँट होती. या प्रकरणी गौतम भालेराव यांच्या फिर्यादी वरून वरील वर्णनाच्या अज्ञाता विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं २३४/२०२१ भा. दं. वि. ३९२ नुसार रस्त्यात अडवून वाटमारी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे करीत आहेत.


No comments