Breaking News

नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या सिरसाळा येथील आरोग्य अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबीत करा- पौळ


राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ यांची पालकमंत्री, जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मागणी

सिरसाळा : बीड जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. शहरातच नाही तर ग्रामीण भागातही याचा फैलाव वेगाने होत असून रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे रात्रंदिवस प्रयत्नशील आहेत. मात्र त्यांच्या या जीवतोड प्रयत्नांना काही शासकीय कर्मचारी महत्व न देता कामचुकारपणा करत असल्याचे निदर्शनास येत आहे. परळी तालुक्यातील सिरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात असाच सावळा गोंधळ होत असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ यांनी पालकमंत्री ना.धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली असून, त्यात सिरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात सतत गैहजार राहणारे व नागरिकांशी उद्धटपणे वागणारे वैद्यकीय अधिकारी डॉ.सोमनाथ मुंडे यांना येत्या आठवड्याभरात निलंबित करावे अन्यथा त्रस्त नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करेन असा इशारा दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ यांनी पालकमंत्री ना.धनंजय मुंडे, बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांना तक्रार वजा एक निवेदन पाठवले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, सिरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात सगळा सावळा गोंधळ सुरू आहे. केंद्राची जबाबदारी असलेले डॉ.सोमनाथ मुंडे कधीच तेथे हजर नसतात, याउलट त्यांचे लक्ष परळीच्या त्यांच्या खाजगी दवाखान्यावर जास्त आहे. शासनाची पगार घेऊन जबाबदारीच्या कालावधीत  खाजगी प्रॅक्टिस करणे हा नियमाने गुन्हा आहे. 

सिरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्रावर त्या परिसरात असणाऱ्या जवळपास 60 ते 65 गावांतील नागरिकांचे आरोग्य अवलंबून आहे. आज कोरोनाच्या काळात या परिसरातील गावात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे. डॉक्टर स्वतः गैरहजर राहून तेथील सगळा भार कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर सोपवून देतात आणि ते स्वतःच्या खाजगी दवाखान्यात काम करतात. कधी कुठल्या गोष्टीबाबत चौकशी करण्यासाठी फोन केला तर ते उद्धटपणे उत्तरे देऊन समोरच्याशी अरेरावीने बोलतात. असाच अनुभव मला स्वतःला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आला आहे असंही लक्ष्मण तात्या पौळ यांनी पाठवलेल्या निवेदनात म्हटलेलं आहे. सर्व मुद्द्यांचा उल्लेख करून आरोग्य अधिकारी डॉ.सोमनाथ मुंडे यांनी केलेल्या अरेराविचा पुरावा म्हणून या निवेदनाच्या सोबत फोनवर झालेल्या संभाषणाची रेकॉर्डिंग सुद्धा पाठवण्यात आली आहे. 

कारवाई करा अन्यथा आंदोलन -लक्ष्मण तात्या पौळ

सिरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.सोमनाथ मुंडे हे कधीच केंद्रात हजर नसतात. त्यांच्या गैरहजेरीत केंद्राची आरोग्य यंत्रणा पुर्णपणे विस्कळीत होत असून या भागातील नागरिकांची गैरसोय होते आहे.दररोज कित्येक तक्रारी नागरिक करत आहेत परंतु याकडे दुर्लक्ष केले जात असून तक्रारींना केराची टोपली दाखवली जात आहे. आज कोरोनाच्या काळात इथली सुव्यवस्था अबाधित राहणे गरजेचे असतांना डॉक्टरांचा निष्काळजीपणा रुग्णांना भोवत आहे. याला कारणीभूत ठरणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्याला तात्काळ निलंबीत करावे अशी मागणी मी जिल्ह्याचे कर्तव्यतत्पर पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे साहेब, जिल्हाधिकारी बीड आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे. येत्या आठ दिवसांत कारवाई झाली नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचेही कळविले आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ यांनी दिली आहे. 

No comments