Breaking News

जिओ जिंदगीच्या मोफत रुग्णसेवेला समाज विसरणार नाही - ना.धनंजय मुंडे


घाटसावळी येथे जिओ जिंदगीच्या मोफत दवाखान्याचे व माजलगाव येथील तुळजाभवानी अर्बनच्या 100 बेडच्या कोविड केअर सेंटरचे ना. मुंडेंच्या हस्ते लोकार्पण

बीड/माजलगाव  : देशभरात कोरोना संकटाने रौद्र रूप धारण केले आहे अश्या वेळी विकत आरोग्य सेवा मिळत नसताना नि:शुल्क रुग्णसेवा करण्यासाठी जिओ जिंदगी अभियान व डॉक्टर मंडळी समोर आलेली आहे. बीड जिल्ह्यात प्रातिनिधिक स्वरूपात जिओच्या दहा दवाखान्यांचे लोकार्पण पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांनी केले. घाटसावळी येथील समर्थ रुग्णालयात मोहिमेची सुरवात केल्यानंतर जिओ ची मोहीम समाज कधी विसरणार नाही असे ना धनंजय मुंडे यांनी म्हटले. डॉ रामप्रसाद राऊत व डॉ कृष्णा राऊत यांच्या जरूड व घाटसावळी दवाखाना यापुढे मोफत सेवा देणार असल्याचे जाहीर केले आहे. 

महाराष्ट्र दिनी सुरू झालेली ही मोहीम मानवता व सेवेचे दायित्व सिद्ध करणारी आहे या मोहिमेत सेवा देणारे डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ तसेच समाजातील दानशूर व्यक्ती यांनी मानवतेला कायम लक्षात राहील अशी भूमिका दिली आहे, असे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले. यावेळी जिओ जिंदगीचे पत्रकार भागवत तावरे, भास्कर ढवळे, संतोष ढाकणे, धनंजय गुंदेकर, दादासाहेब मुंडे, अजमेर मणियार, गणेश तांबे, जालिंदर काकडे, विठलं घरत, मनोज नागरे, शुभम काळे, दत्ता प्रभाले, रामप्रसाद फड, रवी गंगावणे आदी उपस्थित होते. माजलगाव येथे तुळजाभवानी अर्बन पतसंस्थेच्या वतीने येथील केशवराज मंगलकार्यालयात सुरू केलेल्या 100 बेडच्या कोविड केअर सेंटरचे लोकार्पणही धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपलब्ध सुविधांची पाहणी करत ना. मुंडे यांनी येथे दाखल रुग्णांशी व डॉक्टरांशी संवाद साधला. 

बीड जिल्ह्यात शासन प्रशासन कोरोनाशी दोन हात करत असताना जिओ जिंदगी, तुळजाभवानी अर्बन यासारख्या सेवाभावी संस्थेने सुरू केलेली ही मोहीम रुग्णांना आधार व उपचार देणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील टेस्टिंग व ट्रेसिंग वाढणार असून संसर्गाला आळा घालण्यास मदत होणार आहे. एकीकडे दवाखान्याचा खर्च सामान्य रुग्णांना जड जात असताना नि:शुल्क सेवा देणारी जिओ जिंदगीने उभी केलेली मोहीम ही दिलासादायक असल्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले. दरम्यान वाढत्या रुग्णासंख्येशी लढताना डॉक्टर्स, पॅरा मेडिकल स्टाफ, समाजातील दानशूर व्यक्ती यांचे या काळातील कार्य पाहून पदोपदी माणुसकीचा प्रत्यय येत असल्याची भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे. 


No comments