Breaking News

शासन-प्रशासनाने पोलीस आणि प्रेस चा आदर्श घ्यावा! जिल्हाधिकारी साहेब बीड नगर परिषद च्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना लगाम लावा - सय्यद इलयास

बीड :   कोरोना काळात जिथे एकीकडे आपल्या जिवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणारे पोलीस कर्मचारी आणि वर्तमानपत्रांचे वार्ताहर आपआपले कर्तव्य पार पाडत आहे. तिथे दुसरीकडे बीड नगरपरिषद चे अधिकारी व कर्मचारी जनतेवर सूड उगवण्याची एकही संधी सोडत नसल्याचा आरोप एआयएमआयएम पक्षाचे युवानेते सय्यद इलयास यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केला असून दस्तुरखुद्द जिल्हाधिकाऱ्यांनीच आता जनतेला त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर लगाम लावावा अशी मागणी केली आहे.

याविषयी दिलेल्या पत्रकात सविस्तर पणे नमूद केले आहे की, शहरात नळांना बारा पंधरा दिवसानंतर पाणी सोडण्यात येते. दिवसातून  दहा वेळेस लाईट जाते. चालायला रस्ते धड नाही. नाल्यातून आलेल्या नाल्यांचे पाणी रस्त्यांवर. संपूर्ण बीड शहरात मच्छरांचा उच्छाद असून मच्छरांची पैदास कमी व्हावी याकरिता धूर फवारणी, नाल्यात औषध फवारणी, नाल्याच्या कडेला पावडर फवारणी, यापैकी काहीही केले जात नाही. घरकुल व शौचालय मंजूर झालेल्यांना अनुदान वाटप अद्याप नाही, असे एक ना अनेक रडगाणे बीड नगरपरिषदे कडून गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. परंतु याचे कुठलेही सोयरसुतक मुख्याधिकारी यांच्यासह नगराध्यक्षांना सुद्धा नाही. त्यात पुन्हा कोरोना काळात वारंवार लावण्यात येणार्‍या लॉक डाऊन चा फायदा घेतात. बीड नगरपरिषद चे अधिकारी व कर्मचारी शहरात कुठेही कधीही उभे राहून किंवा गस्त घालताना जनतेला कुठल्याही सबबीखाली हजार, पाचशे रुपयांचा दंड ठोठावत आहे. 

एक तर लॉक डाऊन मुळे लोकांचे रोजगार बंद झाले आहेत. त्यात पुन्हा अशा प्रकारे जनतेला दंड देणे म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. नगरपरिषद अधिकारी कर्मचाऱ्यांच्या या भूमिकेमुळे जनतेच्या मनात असंतोष खदखदत आहे. त्याचा उद्रेक कधीही होऊ शकतो आणि शहरात आणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. मुख्याधिकारी असलेले उत्कर्ष गुट्टे यांच्या नावातच फक्त उत्कर्ष आहे. प्रत्यक्षात मात्र शहराचा उत्कर्ष त्यांच्या कार्यकाळात काही होत नाही. एकंदरीत अशी सर्व अवस्था पाहता कोरोना लॉक डाऊन मध्ये सुसाट सुटलेल्या बीड नगर परिषद च्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना लगाम लावावा. त्यांना पोलीस आणि वार्ताहरांचा आदर्श घ्यायला सांगावा आणि जनतेला त्यांच्या त्रासापासून वाचवावे. अशी मागणी एआयएमआयएम चे युवा नेते सय्यद इलयास यांनी प्रसिद्धी माध्यमात दिलेल्या पत्रकातून जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

  

No comments