Breaking News

मोफत ऑक्सीजन देणारी झाडे वाचवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात विद्युत शवदाहीनी उभारा ‘आम्ही वृक्ष मित्र’ संघटनेची मागणी; ऑक्सीजनविना मरणार्‍यांना झाडे तोडून जाळले जाते, हे दुर्दैव!

बीड  : कोरोना महामारीत ऑक्सीजन न मिळाल्याने रूग्णांचा श्‍वास कोंडत आहे. श्‍वास कोंडून माणसे मरण असताना एका मृताच्या अंत्यसंस्कारासाठी 5 ते 7 क्विंटल लाकूड जाळले जाते. बीड जिल्हयात 15 हुन अधिक मोठ्या सर्वाजनिक स्मशानभूमी असून प्रत्येक ठिकाणी रोज कमीत कमी 5 जणांवर अंत्यस्कार होतात. याची बेरीज केल्यास दिवसाला 375 तर महिन्याला 11 हजार 250 क्विंटल लाकूड लागते. ऑक्सीजन विना लोक मरत असताना मृतांना जाळण्यासाठी मोफत ऑक्सीजन देणारी झाडे तोडली जातात, हे सर्वात मोठे दुर्दैव असल्याचे सांगत ‘आम्ही वृक्ष मित्र’ संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देत प्रत्येक तालुक्यात विद्युत शवदाहीनी उभा करण्याची मागणी केली.  
आम्ही वृक्ष मित्र संघटनेच्या वतीने बालाजी तोंडे, अशोक तांगडे, तत्वशील कांबळे यांनी सोमवारी (दि.10) जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांना निवेदन दिले. ऑक्सीजन विना माणसे मरत असताना मोफत ऑक्सीजन देणारी झाडे तोडून मयतांवर अंत्यसंस्कार केले जातात या विषयी त्यांनी खंत व्यक्त केली. या निवेदनात म्हटले आहे, प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात, राज्यात नव्हे तर देशात कोरोना महामारी आणि ऑक्सीजन (प्रानवायू) तुटवड्यानेअक्षरश: हाहाकार माजवला आहे. जगातील अनेक देशातून विमानाने तर देशांतर्गत रेल्वेने ऑक्सीजन मागवावा लागत आहे.
 प्राणवायुच्या तुटवड्याने आणीबाणीपेक्षाही भयंकर परिस्थिती उद्भवली आहे. दिल्ली, मुंबई सारख्या शहरातच नव्हे तर वाड्या- वस्त्या आणि तांड्यावर राहणार्‍या लोकांचाही ऑक्सीजन विना श्‍वास कोंडू लागला आहे. वेळेत ऑक्सीजन न मिळाल्यामुळे शहरात आणि ग्रामीण भागातील खेडे गावात किडा मुंगीप्रमाणे माणसे मरत आहेत. कोरोना महामारीत प्राणवायुचे महत्व अधोरेखीत होत असताना प्रत्येक तालुक्यातील स्मशानभूमीत रोज काही टन लाकडे जाळून मयतांवर अंत्यसंस्कार केले जातात. ऑक्सीजनचा तुटवडा असताना श्‍वास गुदमरून मरणार्‍या लोकांना मोफत ऑक्सीजन देणारी झाडे तोडून जाळले जाते हे सर्वात मोठे दुर्दैव आहे. ग्रामीण भागात होणारे अंत्यसंस्कार सोडून दिले. केवळ तालुका मुख्यालयाच्या ठिकाणची आकडेवारी पाहीली तरी रोज हजारो झाडांची  केवळ अंत्यसंस्कारासाठी कत्तल होते.  बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यात 15 पेक्षा अधिक मोठ्या आणि सार्वजनिक स्मशानभूमी आहेत. सध्ये प्रत्येक स्मशानभूमीत 5 पेक्षा अधिक लोकांवर अंत्यसंस्कार केले जातात. एका मयतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी 5 ते 7 क्विंटल लाकूड जाळले जाते. याची बेरीज केल्यास दिवसाला 375 तर महिन्याला 11 हजार 250 क्विंटल लाकूड लागते. एका झाडापासून जास्तीत जास्त 5 क्विंटल वाळलेले लाकूड मिळाले असे गृहीत धरले तरी एकट्या बीड जिल्ह्यात केवळ अंत्यसस्काराच्या लाकडासाठी महीन्याला काही हजार झाडे तोडली जातात. राज्यात 37 जिल्हे असून वर्षाकाठी अंत्यसंस्कारासाठी कमीत कमी 50 लाख क्विंटल लाकडू लागते.
ऑक्सीजन विना माणसे मरत असताना ऑक्सीजनचा प्रमूख आणि नैसर्गीक स्त्रोत असलेली लाखो झाडे मयतांना जाळण्यासाठी तोडली जातात हा सर्वात मोठा विरोधाभास असल्याची व्यथा वृक्ष मित्रांनी जिल्हाधिकारी यांच्यापुढे मांडली. मोफत ऑक्सीजन देणारी झाडे वाचवण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयी विद्युत शवदाहीनी तात्काळ उभा करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
भविष्यातील पिढीला श्‍वास तरी ठेवा
कोरोना संसर्गाने महाराष्ट्रात आजपर्यंत 75 हजार 859 लोकांचा बळी गेला. यातील दहा हजार लोकांचा दफनविधी झाला असे गृहीत धरले तरी उरलेल्या 65 हजार कोरोना मयतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मोफत प्राणवायु देणार्‍या झाडांची साडेतीन लाख क्विंटल लाकडे  जाळण्यात आली. फक्त कोरोना मृतांचे अंत्यसंस्कार जरी विद्युत शवदाहीनीत केले असते तरी एक लाख भर झाडे वाचली असती. ऑक्सीजनचे महत्व पटल्यानंतरही आपण वृक्षतोड थांबवली नाही तर भाविष्यातील आपल्या पिढीचा श्‍वास घेण्याचा अधिकारही हीरावून घेणार आहोते. पुढच्या पिढीला वारशात फार काही नाही देता आले तरी किमान मोकळा श्‍वास तरी देऊ.
-बालाजी तोंडे, आम्ही वृक्षमित्र संघटना, बीड

No comments