Breaking News

बीड केज महामार्गावर आरोग्य कर्मचाऱ्याची गाडी अडवून ९३ हजाराचा ऐवज लुटला : स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या बारा तासात आरोपी केले जेरबंद !

तीन संशयित आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी

वडिलांच्या अंत्यविधीसाठी गावी जात असताना वाटमारीची घडली होती घटना, केज-बीड महामार्गावरील चोऱ्या रोखणे पोलिसा समोर आव्हान !

चोर निर्ढावले की, पोलिसांचा धाक उरला नाही ? केजकरांचा संतप्त सवाल

गौतम बचुटे । केज 

वडिलांच्या क्रियाकर्मासाठी गावी जात असलेल्या  पोलीस कॉलनीतील एका आरोग्य कर्मचाऱ्यास बीड-केज महामार्गावर गाडी अडवून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा ९३ हजाराचा ऐवज लुटून नेला. या धाडसी वाटमारीमुळे केज- बीड महामार्गावरील रात्रीचा प्रवास धोक्यात असल्याचे अधोरेखित झाले आहे. यामुळे आता चोर निर्ढावले आहेत की, लॉक डाऊनमुळे पोलिसांचा धाक उरला नाही. असा संतप्त सवाल केजकरांमधून उपस्थित केला जात आहे. 

या बाबतची माहिती अशी की, दि.१४ मे रोजी लातूर जिल्ह्यातील सलगरा येथील रहिवाशी आणि नाशिक जिल्ह्यातील आडगाव पोलीस वसाहतीत राहात असलेले आरोग्य खात्यात नौकरी करीत असलेले प्रदीप अशोक कांबळे हे त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याने वडिलांच्या इतर विधीसाठी लातूरकडे स्विफ्ट गाडीने क्र. (एम एच-०२/ई एच-१०६८) येत असताना रात्री सुमारे २:०० वा. च्या सुमारास बीड- केज महामार्गावर सावंतवाडी पाटी जवळ अचानक चार अज्ञात चोरटे गाडी समोर आले. प्रदीप कांबळे यांनी ते चौघे समोर येताच गाडी थांबवली; त्याच वेळी चोरट्याने गाडीची चावी काढून घेतली आणि त्यानी त्यांच्या कडील नगदी २१ हजार रु. तसेच १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (६८ हजार रु.) व चांदीचे ८ तोळे दागिने किंमत (४ हजार ४०० रु ) असा एकूण रु. ९३ हजार ४०० रु. किंमतीचा मुद्दे माल या वाटमारीत चोरून नेला.या प्रकरणी प्रदीप कांबळे यांनी केज पोलिसांत दिलेल्या तक्रारी वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध गु. र. न. २४०/२०२१ भा. दं. वि. ३९२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान वडिलांच्या अंत्यविधीसाठी गावी जाणाऱ्या एका आरोग्य कर्मचाऱ्यालाच चोरट्यानी रस्त्यात अडवून लुटल्याची घटना घडताच पोलीस खाते खडबडून जागे झाले. गुन्हा दाखल होताच बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या बारा तासाच्या आत अनिल पवार, भागवत पवार, बबन पवार आणि एक अल्पवयीन अशा चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. या वाटमारीतील संशयितांना स्था. गु. शा. चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे, बालासाहेब दराडे यांनी ताब्यात घेतले. तीन संशयित आरोपींना न्यायालया समोर हजर केले असता तिघांना दि.१७ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे हे करीत आहेत.


No comments