Breaking News

मोटार सायकलवर थाटले खरबूज विक्रीचे दुकान साळेगाव येथील खरबूज उत्पादक शेतकरी भागवत मुळे यांची आयडिया

गौतम बचुटे । केज

तीन-चार महिने शेतात कष्ट करून पिकविलेला माल विक्रीसाठी तयार झाला. मात्र त्यात कोरोना महामारी आडवी आली. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन असल्याने आता हा माल शेतात सडून परवडणारे नव्हते. म्हणून एका खरबुज पिकविण्याणाऱ्या शेतकऱ्याने चक्क दुचाकीवरच खरबूज विक्रीचे फिरते दुकान थाटले. खेडोपाडी व गावोगाव फिरून ते विक्री करीत आहेत.

केज तालुक्यातील साळेगाव येथील भागवत मुळे या युवकाने आपल्या शेतात सव्वा एकर क्षेत्रात खरबुजाची लागवड केली. त्याला खतपाणी, फवारणी व अंतर मशागत करून पीक जोमाने वाढविले; परंतु ऐन खरबुज विक्रीला येणार तोच महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने डोके वर काढले. त्यामुळे सर्वत्र लॉक डाउन करण्यात आले. मात्र आता हाता-तोंडाशी आलेल्या या खरबुजची करायचे काय? हा प्रश्न भागवत मुळे यांच्या पुढे उभा राहिला. कारण हे फळ नाशवंत आहे. फळ तोडणी नंतर काही दिवस भागवत मुळे याने एक माल वाहतूक करणारे छोटा हत्ती सारखे वाहन भाड्याने करून परिसरात खरबुज विक्री सुरू केली. पण भाड्याचे वाहन परवडत नव्हते. मग त्यांनी मोटार सायकललाच दोन्ही वाजुला व मागे एक असे लोखंडी हँगर बनवून त्यात प्लॅस्टिकचे मोठे क्रेट ठेवून त्यात सुमारे एक क्विंटल माल घेऊन व एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा सोबत घेऊन त्यांनी केज, कळंब या सह परिसरात खरबूज विक्री सुरु केली आहे.

आता पर्यंत त्यांनी २ लाख ८० हजार रु. चे खरबूज विक्री केले आहे. यातून त्यांना उत्पन्न मिळाले आहे. मात्र जर लॉक डाऊन नसते आणि मार्केट खुले असते तर निश्चितच आणखी याही पेक्षा जास्त फायदा झाला असता. मात्र जर मेहनत आणि जिद्द असेल तर कोणत्याही संकटावर मात करून यशस्वी होता येते. हे भागवत मुळे यांनी दाखवून दिले आहे.

 

" सध्या मुस्लिम बांधवांचा रमजानचा उपवासाचा महिना सुरू असून कडक उन्हाळा सुरू असल्याने खरबुजला मागणी आहे."

                --- भागवत मुळे,

No comments