Breaking News

स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात म्युकर मायकोसिस रुग्णांची संख्या वाढली ५२ रुग्णांवर उपचार; ३२ जणांवर शस्त्रक्रिया तर ५ जणांचा मृत्यू

शिवाजी भोसले । अंबाजोगाई 

अंबाजोगाई तालुक्यातील कोरोनातुन बरे झाल्यानंतर आढळून येणाऱ्या पोस्ट कोविड रुग्णांपैकी म्युकर मायकोसीस या रोगाची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या स्वाराती रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. आजपर्यंत ५२ रुग्ण दाखल झाले असून त्यापैकी ३२ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे तर ५ रुग्ण मयत झाल्याची माहिती स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या कान-नाक-घसा (इ.एन. टी.) विभाग प्रमुखांनी दिली आहे.

स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात पोस्ट कोविड आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर येत आहेत. सध्या पोस्ट कोविड मधील म्युकर मायकोसीस या आजारावर उपचार घेण्यासाठी बीड जिल्ह्याशिवाय नांदेड, परभणी, जालना जिल्ह्यातुनही अनेक रुग्ण दाखल होत आहेत. पोस्ट कोविड नंतर म्युकर मायकोसीस या आजाराची लक्षणे असलेले ५५ रुग्ण स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल असून यापैकी ३२ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांच्या नाकामधील आणि शेजारी भागातील ब्लॅक फंगस काढण्यात आले असल्याची माहिती ही इ.एन. टी. विभागाचे प्रमुखांनी दिली.

     कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये साखरेची अनियंत्रित पातळी आणि स्टिरॉईडसह अन्य औषधांमुळे कमी झालेल्या रोगप्रतिकारक शक्ती मुळे म्युकर मायकोसिस या बुरशीजन्य आजाराचे प्रमाण दुसऱ्या लाटेत वाढले आहे. या आजारावरील औषधे महागडी असून त्यांच्या किंमती सर्वसामान्य माणसाला परवडणाऱ्या नसल्यामुळे स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. या ठिकाणी इ.एन.टी. विभागाची टीम म्युकरमायकोसिस सारख्या आजारावर उपचार करण्यासाठी सक्षम असून आजपर्यंत ३२ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. दररोज किमान तीन-चार म्युकर मायकोसिसच्या शस्त्रक्रिया सध्या होत आहेत. येणाऱ्या काळात हा आकडा वाढण्याचीही शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

कोविडच्या पहिल्या लाटेत ही कोरोनामुक्त झालेल्या काही रुग्णांना म्युकर मायकोसिस बाधा झाल्याचे आढळले होते. यात काही रुग्णांना दृष्टीही गमवावी लागली होती. दुसऱ्या लाटेत या रुग्णांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे. 'पहिल्या लाटेनंतर दोन महिन्यांतून एखाद्या रुग्णाला याची बाधा झाल्याचे पाहायला मिळत होते; परंतु आता दररोज अनेक नवीन रुग्ण येत आहे. संपूर्ण राज्यात या आजाराचे प्रमाण वाढले असल्याचेही त्यांनी • नमूद केले.

     ही बुरशी शरीरात नाकातून डोळे, मेंदू अशी पसरली जाते. त्याचे निदान सिटीस्कॅन किंवा इतर चाचणीमध्ये होत नाही. ते एमआरआय मध्येच योग्यरितीने होते. प्रत्येक रुग्णाचे एमआरआय करणे गरजेचे आहे. एमआरआय करण्यासाठी साधारण एक तास लागतो आणि ही चाचणी महागही आहे. सध्या एमआयआर चाचण्या केंद्रांवर सिटीस्कॅन साठी एवढी गर्दी असते की एमआरआय साठी वेळ देण्यास ही केंद्र तयार होत नाहीत. त्यामुळे पुढील काळात परिस्थिती आणखी आव्हानात्मक असेल.

म्युकर मायकोसिस आजार कर्करोगा पेक्षाही झपाट्याने वाढतो. 

   सर्वसामान्य असल्याने याचे निदानही लवकर होत नाही. त्यामुळे उपचारासाठी येणारे बहुतांश रुग्ण हे निदान होऊन रुग्णालयात येईपर्यत यांच्यातील आजाराची तीव्रता खूप वाढलेली असते. गेल्या वर्षी आलेल्या पहिल्या फेज मध्ये मेंदुपर्यत हा आजार गेल्याचे फारसे रुग्ण आढळुन येत नव्हते. परंतु सध्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या किमान १० रुग्णांच्या मेंदुपर्यत ही बुरशी पोहोचली असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. यापैकी एका रुग्णांचा डोळा काढावा लागला आहे.

प्रतिबंधात्मक उपायांवर भर हवा

कोरोना झाल्यानंतर स्टिरॉईड खुप प्रमाणात घेतलेले, अतिदक्षता विभागात उपचार घेतलेले, कृत्रिम श्वसनयंत्रणेवर बराच काळ असलेले आणि अनियंत्रित मधुमेह असलेल्या रुग्णांना या आजाराचा धोका अधिक आहे. आजारातून बरे झाल्यानंतर दर आठवड्याला नाकाची तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून केल्यास वेळेत निदान होऊ शकेल. तसेच रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांचीही तपासणी करणे आवश्यक आहे. या आजाराबाबत समाजमाध्यमातून भीती निर्माण करणाऱ्या संदेश पसरविले जात असून रुग्णांनी घाबरून जाता लक्षणे दिसताच तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घ्यावेत असे आवाहनही इ. एन.टी.विभाग प्रमुखांनी केले आहे.

म्युकर मायकोसिसची लक्षणे

नाकातून काळसर द्रव बाहेर पडणे, नाक सतत वाहत राहणे, डोळ्यांमधून पाणी येणे, डोळ्यांना सूज येणे, डोळे लाल होणे, नजर कमी होणे, अकारण दात हलणे, दात दुखणे आदि या रोगाची प्राथमिक लक्षणे आहेत. 

No comments