Breaking News

चमकोगिरीसाठी पत्रकबाजी करणाऱ्या वांझोट्यांनी पत्रका ऐवजी मदत करावी


फुकटचे सल्ले देऊन अडथळा आणणाऱ्यानी लोकहीतासाठी पदरची दमडी तरी खर्चावी !                       

गौतम बचुटे । केज 

कोरोना महामारीच्या कठीण काळात सरकारी यंत्रणा व त्यांना मदत करणाऱ्या अनेक यंत्रणा तसेच सामाजिक संस्था व दानशूर आपापल्या पद्धतीने खूप मोलाचे आणि भरीव कार्य करीत आहेत. त्यातील अनेकजण तर स्वतःच्या नावाचा उल्लेख सुद्धा करीत नाहीत. प्रसिद्धी माध्यमां पासून चार हात दूर राहणे पसंत करतात; परंतु काहीजण मात्र चमकोगिरी करण्यासाठी बिनकामाची व वांझोटी पत्रकबाजी करतात. शासकीय व आरोग्य यंत्रणेच्या विरुद्ध निवेदने, तक्रारी देऊन स्वतःची प्रसिद्धी करून घेत आहेत. अशा फुकट्या सल्लाबहाद्वरांनी व स्वयंघोषित महाभागांनी संकट काळात स्वतःच्या कमरेची दमडी तरी खर्च करावी अशी मागणी होत आहे.

एक वर्षा पेक्षा जास्त काळापासून सर्वजण कोरोना महामारीच्या संकटाचा।सामना करीत आहेत. सर्व यंत्रणा तोकड्या पडत आहेत. आरोग्य, महसूल, स्थानिक स्वराज्य संस्था, गृहविभाग आणि सर्व शासन युद्ध पातळीवर कोरोना संसर्ग रोखण्यासाठी काम करीत आहे. सर्व अधिकारी व कर्मचारी देखील स्वतःच्या जिविताची किंवा कुटुंबाची काळजी न करता सामान्यांसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. सरकार सर्व तिजोरी रीती करून जनतेचा जीव वाचविण्यासाठी धडपडत आहे. यात जरूर उणीवा व त्रुटी आणि काही मानवनिर्मित चुका होतात. हे ही नाकारता येत नाही. मात्र काही महाभाग फक्त बिनकामाची अवास्तव मागण्या आणि चौकशा व तक्रारी करून स्वतःची प्रसिद्धी करीत आहेत. कधी अमुक इंजेक्शन्स द्या. कधी गोळ्या उपलब्ध करा. सीसीटीव्ही बसवा. मंडप टाका; पाणी द्या. स्पिकर बसवा; घरोघरी जाऊन लसीकरण करा. फुकट द्या; पैसे घेऊन द्या. रेशन द्या; पौष्टिक आहार पुरवा. तर रोख मदत द्या. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन तसेच ऑक्सिजन प्लॅन्टस अशा काही आवाक्यातील काही आवाक्या बाहेरच्या मागण्या केल्या जात आहेत.

अशा मागण्या करीत असून वेळ खर्च करीत आहेत अशानी आता केवळ फुकटात प्रसिद्धीचा सोस असणाऱ्यांनी निव्वळ तक्रारी करण्या पेक्षा रुग्ण आणि यंत्रणेला मदत करावी. इतर वेळी कुटुंबातील व्यक्तींनाही मदत न करणाऱ्या व फुशारकी मिरविणाऱ्या स्वयंघोषित व केवळ स्वार्थासाठी आव आणणाऱ्या समाजसेवकांनी दमडी तरी खर्च करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

No comments