Breaking News

दुर्लक्ष : परळी शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद


सीसीटीव्ही पूर्ववत कार्यान्वित करून पोलीसांना पेट्रोलींगसाठी आधुनिक वाहने द्यावीत

राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हा उपाध्यक्ष  चंदुलाल बियाणी यांची मागणी

परळी :  शहरात प्रमुख चौक, रस्ते तसेच सार्वजनिक ठिकाणी १०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून या सर्व कॅमेर्‍यांचा नियंत्रण कक्ष शहर ठाण्यात आहे. परंतु मागील काही महिन्यांपासून सीसीटीव्ही कॅमेरे पुर्णपणे बंद असून ही यंत्रणा धुळखात पडली आहे.  गुन्हेगारी रोखण्यासोबत गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी असलेली अत्याधुनिक व तेवढीच उपयुक्त यंत्रणा तातडीने पुन्हा कार्यरत करावी व पोलीसांना पेट्रोलींगसाठी आधुनिक वाहने द्यावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन विकास समितीचे सदस्य चंदुलाल बियाणी यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक बीड यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

परळी शहरातील बंद पडलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणेकडे रा.कॉ. जिल्हा उपाध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी बीड जिल्हा पोलीस अधिक्षकांचे एका निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. शहरात १०० पेक्षा अधिक कॅमेरे प्रमुख चौक, सर्व रस्ते तसेच सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी बसविण्यात आले आहेत. नव्याचे नऊ दिवस या पद्धतीने वर्षभर कॅमेरे चालू राहीले परंतु नंतर मात्र या यंत्रणेच्या उपयोगीतेकडे प्रशासनाने लक्ष न दिल्याचे बियाणी यांनी प्रस्तूत निवेदनात म्हटले आहे.

गुन्हेगारी रोखण्यासोबत गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा अत्यंत उपयुक्त असतांना, ही यंत्रणा पोलीसांसाठी मदतीचा हात ठरत असतांनाही या तीसर्‍या डोळ्याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे ही खेदाची बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रस्तूत निवेदनात शहर व ग्रामिण पोलीसांसाठी गस्त पथक वापराकरिता असलेली वाहने अत्यंत खराब असून परळी शहर व संभाजीनगर ठाण्याला नव्या अत्याधुनिक पेट्रोलिंग वाहनाची उपलब्धता करुन द्यावी, असेही बियाणी यांनी या निवेदनात नमुद केले आहे. सदर निवेदनाच्या प्रती राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांना पुढील कार्यवाहीस्तव देण्यात आल्या आहेत.


No comments