Breaking News

कवी नवनाथ रणखांबे यांच्या कविता मनाला स्पर्श करतात, थेट काळजापर्यंत पोहोचतात

जीवन संघर्ष या काव्यसंग्रहात कवी  नवनाथ रणखांबे यांनी माणसाच्या जीवनातील वेगवेगळ्या संघर्षाचे अगदी बारकाईने निरीक्षण केलेले आपल्याला दिसून येते, तसेच संघर्ष करत असताना न डगमगता आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याची हिंमत देखील त्यांच्या कवितेतून आपल्याला मिळते.

       माय, तुला मी पाहिलंय*  या त्यांच्या कवितेतून त्यांनी आपल्या समोर जी आई उभी केलीय, ती वाचल्यावर डोळे पाणावल्याशिवाय राहूच शकत नाही.

"तुझ्या जीवन संघर्षाचा,

संग्राम पाहून...

काळ स्तब्ध झाला अन्...

संघर्ष गहिवरला...

ओथंबलेल्या डोळ्यांनी...

ढसा ढसा रडला!

 या कवितेच्या ओळी वाचून आपसूकच डोळ्याच्या कडा ओलावतात.

        कवीची माजोऱ्या पाऊसा कविता वाचताना तर खूपच भावनिक झालो, त्याचं कारणही तसंच आहे,


 "दुष्काळ येतो ओला,

सजीवांना हानी पोहचवतो...

अन् विध्वंस सारा...

२६ जुलै २००५ चा दिवस कोण विसरतो!"

अगदी खरं आहे सर,२६ जुलै २००५ हा दिवस आम्ही तरी कधीच विसरू शकत नाहीत, कारण याच दिवशी माझा अतिशय जवळचा, माझा सख्खा मावसभाऊ या माजोऱ्या पाऊसामुळे आमच्यातून कायमचा निघून गेला.  कवी नवनाथ रणखांबे यांच्या कविता मनाला स्पर्श करतात, थेट काळजापर्यंत पोहोचतात.

      पाऊस पेरणी या कवितेमधून त्यांनी झाडे तोडू नका, वने पेटवू नका, जलचक्र मोडू नका, कारण याचे दुष्परिणाम आपल्यालाच भोगायला लागतात. पाण्यासाठी वणवण आपल्यालाच फिरावं लागतंय असा छान संदेश दिलाय.

"झाडे म्हणजे श्वास! श्वास म्हणजे जगणे!!

पाऊस म्हणजे पाणी! पाणी म्हणजे जीवन!!"

या त्यांच्या ओळी खूप काही सांगून जातात.

         बानं शिकवलं या कवितेतून त्यांनी एका बापाची आपल्या मुलाने खूप शिकावं, शिकून मोठं व्हावं, काहीही झालं तरी आपल्या मुलाने हिंमत हारू नये ही शिक्षणाप्रती तळमळ मांडलेली आहे.

 "शिक्षण वाघिणीचं दूध आहे

         भीमाच्या चळवळीचा गाभा आहे,

लोकांसाठी तुझं जगणं

        हेच तुझं जीणं आहे,

भीमाच्या चळवळीचा नवनाथा

        शिलेदार तुला बनणं आहे!"

या ओळींतून त्या बापाचा शिक्षणाविषयीचा आदर आणि आपल्या मुलाकडून त्याने शिकून खूप मोठं व्हावं ही अपेक्षा खूप काही सांगून जाते.

       उपाशी पोट या त्यांच्या कवितेतून त्यांनी श्रद्धा कशी अंधश्रध्देत रूपांतरित होत चाललेय, तसेच मानवाला अन्नाची नासाडी करू नका, कारण या दीडविताच्या पोटासाठी खूप जीवनसंघर्ष करावा लागतो हे छान पटवून दिलंय.

दाहकता या त्यांच्या कवितेतून समाजात ज्या काही चुकीच्या गोष्टी घडतायेत त्याबद्दलची चीड आपल्याला दिसून येते. शब्दाला जाळा या कवितेतून त्यांनी आतातरी स्वतःला दलित बोलणे सोडा, आपला बौद्ध धम्म हा राजधर्म आहे. गर्वाने बोला आम्ही बौद्ध आहोत, गर्वाने जयभीमचा नारा लावा असं सांगून बाबांच्या मार्गाने चालुया, शासनकर्ती जमात होऊ या आणि सर्वांगीण उन्नती करूया असा सुंदर उपदेश केलाय. कवी नवनाथ रणखांबे यांच्या जातीचे ग्रहण, माणूसपण विसरला, डॉ. आंबेडकर, मोडेल कणा, चढउतार, थरकाप, आलेला निधी, काडीमोड घेणारे दिल, अखेरचा श्वास, आयुष्याच्या पहिल्या प्रेमात, रात्र माझी जागत होती, मात या सर्व कविता मनाला खूप भावल्या.

कवीनी या काव्यसंग्रहातून  आई, वडील, समाजव्यवस्था, अन्याय, संघर्ष, प्रेम, विरह, जात  यासारख्या अनेक विषयांवर प्रकाश टाकलाय.

          हा काव्यसंग्रह वाचकांना निश्चितच अधिकाधिक आवडेल यात शंकाच नाही. कवीचा काव्यरुपी प्रवास असाच अविरत चालू राहो एवढे बोलून आपल्या या काव्यसंग्रहास माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा देतो!

पुस्तक :-  जीवन संघर्ष

कवी :- नवनाथ रणखांबे

प्रकाशन  :- शारदा प्रकाशन ठाणे

पाने -: ८०

मूल्य :- ८० ₹

पुस्तक परिक्षण लेखक  :- सुभाष थोरात , मुरबाड / ठाणे

मोबाईल :-  ८१६९७३६०५६ / ८१०८२२५०३८

No comments