Breaking News

साळेगाव खून प्रकरणातील मारेकरी जावई पोलिसांच्या ताब्यात : आरोपीचा तपास काढण्यात डी बी पथकाची विशेष कामगिरी


गौतम बचुटे । केज 

भर रस्त्यात सासूचा खून करून पसार झालेल्या मारेकरी जावयाला अखेर केज पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

या बाबतची अधिक माहिती अशी की, दि. २५ एप्रिल, रविवार रोजी केज तालुक्यातील साळेगाव येथे दुपारी १२:०० ते १२:३० च्या दरम्यान केज कळंब महामार्ग क्र. ५४८- सी वरील संताजी हॉटेल समोर जावई अमोल वैजिनाथ इंगळे व त्याचा पुतण्या बंटी उर्फ प्रशांत बबन इंगळे या दोघांनी अमोलची सासू लोचना माणिक धायगुडे व तिचा पुतण्या अंकुश धायगुडे यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांची मोटार सायकल अडवून लोचना धायगुडे हिच्या गळ्यावर, मानेवर व डाव्या हातावर जावई अमोल इंगळे याने धारदार कोयत्याने निर्घृणपणे सपासप वार करून तिचा जागीच खून केला. तसेच अंकुश धायगुडे याच्यावरही कोयत्याने हल्ला केला होता. यात त्याच्या दोन्ही हाताला जबर दुखापत झाली होती. या नंतर अमोल इंगळे व त्याचा पुतण्या बंटी उर्फ प्रशांत इंगळे हे दोघे अंकुश धायगुडे यांची होंडा शाईन मोटार सायकल क्र. एम एच -४४/ व्ही-०५६४ ही घेऊन गांजी रस्त्याने पसार झाले होते.

या प्रकरणी अंकुश धायगुडे याच्या फिर्यादी वरून अमोल इंंगळे व बंटी उर्फ प्रशांत इंगळे याच्यावर जखमी अंकुश धायगुडे याच्या फिर्यादी वरून गु. र. न. २०६/२०२१ भा. दं. वि. ३०२, ३०७, ५०४ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील बंटी उर्फ प्रशांत इंगळे यास तात्काळ ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले होते मात्र मुख्य गुन्हेगार अमोल इंगळे हा पोलिसांना गुंगारा देत होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, दादासाहेब सिद्धे, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे पोलिसांचे दोन पथके तैनात करण्यात आली होती.

दरम्यान मारेकरी जावई अमोल इंगळे हा त्याच्या नातेवाईकांच्या संपर्कात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना गुप्त खबऱ्या मार्फत पोलीस पथकाला मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत तसेच पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे आज दि. १८ रोजी पहाटे सापळा रचला आणि सकाळी ७:०० वा. च्या दरम्यान तो झोपेत असतानाच अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलीस स्टेशन हद्दीतील पट्टीवडगाव येथील शेतातुन त्याच्या मुसक्या आवळल्या.

आरोपीला ताब्यात या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे, अशोक नामदास, मतीन इनामदार, मंगेश भोले, अमोल गायकवाड, तपास शाखेचे दिलीप गित्ते, महादेव बहिरवाळ, बाळासाहेब थोरात यांच्या पथकाने त्यास ताब्यात घेण्यासाठी परिश्रम घेतले.

सासूचे अनैतिक संबंध 

मयत लोचना धायगुडे हिचे त्यांच्या भावकितीलच अंकुश धायगुडे याच्या सोबत अनैतिक संबंध होते. याचा राग अमोलला होता व त्यात ते दोघेही अमोलला सोबत भेटले म्हणून त्याचा राग अनावर झाला व त्यातून त्यांनी सासू लोचना व अंकुश यांच्यावर कोयत्याने हल्ला केला.*

चुलती व पुतण्याच्या नात्याला काळिमा ! :- मयत लोचना धायगुडे व जखमी अंकुश हे नात्याने जरी चुलती-पुतणे होते तरी त्यांच्यात अनैतिक संबंध होते. ते दोघे अंबाजोगाई येथे पती-पत्नी प्रमाणे एकत्र राहत होते.


No comments