Breaking News

कोरोना केअर सेंटरसाठी 11 हजार 111 रुपये देणगी


बँक अधिकारी विकास म्हस्के यांनी जपली सामाजिक बांधिलकी

आष्टी ः सध्या कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवलेला असताना या परिस्थितीत मदतीचे अनेक हात गरजूंसाठी पुढे येत आहेत. अहमदनगर येथे बँक अधिकारी असलेले विकास देवराव म्हस्के यांनी आष्टी तालुक्यातील सावरगाव (मायंबा) येथे देवस्थानच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कोरोना केअर सेंटरसाठी 11 हजार 111 रुपये देणगी तसेच रुग्णांसाठी उपयोगी साहित्य भेट दिले आहे. श्री. म्हस्के यांनी जपलेल्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक होत आहे.

आष्टी तालुक्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने काळजीत भर पडली आहे. शासनासह विविध सामाजिक संस्था, नेतेमंडळी व दानशूर व्यक्तींच्या पुढाकारातून  विविध ठिकाणी कोविड रुग्णांसाठी उपचार केंद्र सुरू करण्यात येत आहेत. तालुक्यातील सावरगाव येथील प्रसिद्ध श्री मच्छिंद्रनाथ देवस्थानतर्फे (मायंबा) गावात आमदार सुरेश धस यांच्या पुढाकाराने कोरोना केअर सेंटर कालपासून (दि. 30) सुरू करण्यात आले आहे.

देवस्थानच्या या लोकोपयोगी कार्याला गावचे भूमिपुत्र व अहमदनगर येथे अभ्युदय बँकेत अधिकारी असलेले विकास देवराव म्हस्के यांनी लगेच मदतीचा हात पुढे केला. या सेंटरसाठी म्हस्के यांनी 11 हजार 111 रुपयांची मदत दिली. मदतीचा धनादेश तसेच रुग्णांसाठी ऑक्सीमीटर, वाफ घेण्याची मशीन (स्टीमर), मास्क, सॅनिटायझर, बिस्कीटपुडे आदी साहित्यही म्हस्के यांनी देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी देवस्थानचे स्वामी विजयानंद,  सरपंच राजेंद्र म्हस्के, विश्वस्त अनिल म्हस्के, नवनाथ म्हस्के, युवा कार्यकर्ते गणेश म्हस्के, संजय म्हस्के आदी उपस्थित होते.

म्हस्के यांचा दानशूरपणा

शेतकरीपुत्र असलेले विकास म्हस्के गरजूंच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर राहतात. मागील वर्षी लॉकडाऊनमध्ये त्यांनी गरजूंना किराणा व साहित्याची मदत दिली होती. विविध आपत्तींच्या प्रसंगी त्यांनी वेळोवेळी मदतीचा हात पुढे केलेला आहे. दोन वर्षांपूर्वी दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत त्यांनी 55 हजार 555 रुपयांची मदत आमदार सुरेश धस यांच्याकडे दिली होती. मागील वर्षी कोरोनाग्रस्तांसाठी 55 हजार 555 रुपयांची मदत नगरचे आमदार संग्राम जगताप यांच्याकडे सुपूर्द केली. सन 2011मध्ये मायंबा देवस्थानच्या विकासासाठीही त्यांनी 55 हजार 555 रुपयांची मदत माजी आमदार साहेबराव दरेकर यांच्याकडे सुपूर्द केली होती. 


No comments