Breaking News

साळेगाव येथील खून प्रकरणातील एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात !


दुसऱ्याच्या तपासासाठी दोन पोलीस पथके तैनात

बंटी उर्फ प्रशांत यास तीन दिवसांची पोलीस कोठडी

गौतम बचुटे । केज

अत्यंत निर्घृण पद्धतीने सपासप वार करून भर दुपारी ऐन रस्त्यात थरारक पद्धतीने सासूचा धारदार कोयत्याने हत्या केलेल्या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या साथीदाराला पोलिसांनी अवघ्या बारा तासाच्या आत जेरबंद केले. त्याला सत्र न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. मुख्य आरोपी अमोल इंगळे दुसऱ्याला ताब्यात घेण्यासाठी दोन पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत.

या बाबतची अधिक माहिती अशी की, दि. २५ एप्रिल, रविवार रोजी केज तालुक्यातील साळेगाव येथे दुपारी १२:०० ते १२:३० च्या दरम्यान केज कळंब महामार्ग क्र. ५४८- सी वरील संताजी हॉटेल समोर जावई अमोल वैजिनाथ इंगळे व त्याचा पुतण्या बंटी उर्फ प्रशांत बबन इंगळे या दोघांनी अमोलची सासू लोचना माणिक धायगुडे व तिचा पुतण्या अंकुश धायगुडे यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांची मोटार सायकल अडवून लोचना धायगुडे हिच्या गळ्यावर, मानेवर व डाव्या हातावर जावई अमोल इंगळे याने धारदार कोयत्याने निर्घृणपणे सपासप वार करून तिचा जागीच खून केला. तसेच अंकुश धायगुडे याच्यावरही कोयत्याने हल्ला केला. यात त्याच्या दोन्ही हाताला जबर दुखापत झाली आहे. या नंतर अमोल इंगळे व त्याचा पुतण्या बंटी उर्फ प्रशांत इंगळे हे दोघे अंकुश धायगुडे यांची होंडा शाईन मोटार सायकल क्र. एम एच -४४/ व्ही-०५६४ ही घेऊन गांजी रस्त्याने पसार झाले होते.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत तसेच पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलिस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे, सहाय्यक फौजदार कादरी, अशोक नामदास, मतीन इनामदार, मंगेश भोले, भास्कर सिरसाट, अमोल गायकवाड, यादव, तपास शाखेचे दिलीप गित्ते, जिवन करवंदे, आय बाईकचे कर्मचारी सचिन अहंकारे, वैभव राऊत, शेख हे घटनास्थळावर दाखल झाले होते. दरम्यान या हल्ल्यातील जखमी अंकुश घायगुडे यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस स्टेशनला अमोल वैजिनाथ इंगळे व बंटी उर्फ प्रशांत इंगळे याच्या विरुद्ध खून करणे व खुनाचा प्रयत्न करणे. या आरोपावरून गु. र. न. २०६/२०२१ भा. दं. वि. ३०२, ३०७, ५०४ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे दोन पथके तैनात करण्यात आली आहेत.

यातील एक आरोपी बंटी उर्फ प्रशांत बबन इंगळे यास अवघ्या १२ तासाच्या आतच पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला अंबाजोगाई सत्र न्यायालयाने पुढील तपासासाठी दि. २९ एप्रिल पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच मुख्य आरोपी अमोल इंगळे याच्या देखील लवकरच मुसक्या आवळण्यात येत आहेत. 

No comments