Breaking News

शेतकऱ्यांचे प्रश्न विधिमंडळात मांडणारे पहिले आमदार डॉ. बाबासाहेब आंबेडकर : प्रा. लक्ष्मण गुंजाळ


बीड :  भारतीय शेतकऱ्यांचे प्रश्न प्रथमच ग्रंथरूपात क्रांतीबा ज्योतिबा फुले यांनी जनतेसमोर मांडले.तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा आवाज विधिमंडळा पर्यंत पोहोचवणारे व विधिमंडळामध्ये त्या प्रश्नांना वाचा फोडणारे पहिले आमदार डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते,असे मत प्रा. लक्ष्मण गुंजाळ यांनी व्यक्त केले.

क्रांतीबा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने, प्रियदर्शी धम्म संस्कार शिक्षण संस्था, बीड व सम्यक संकल्प समता पर्व, बीड च्या वतीने ऑनलाइन व्याख्यानमाला कार्यक्रमाप्रसंगी दि. 16 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी 8:00 वाजता फेसबुक लाईव्ह द्वारे "अनंत पैलूंचा सामाजिक योद्धा - दलितेत्तरांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर" या विषयी प्रमुख व्याख्याते म्हणून ते आपले मत व्यक्त करत होते.

पुढे बोलताना प्रा. गुंजाळ म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे राष्ट्रहिताचे होते.शेतकरी, दीनदुबळे, आदिवासी, भटके, विमुक्त, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्यांकांसाठी तर त्यांनी कार्य केलेच, परंतु इथल्या प्रत्येक नागरिकांसाठी सामाजिक विषमता नष्ट करून, समतेचा लढा उभारण्यासाठी अग्रगण्य नेते म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. इथल्या 80 % लोकांचे शोषण प्रामुख्याने 20 % लोकांकडून होत होते.या शोषणाच्या पद्धतशीर शास्त्रास रोखण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन करून माणसाच्या समानतेचा एल्गार उभा केला. राष्ट्रातील शेतकरी व शेती विषयक समाज हा मोठ्या संख्येने कार्य करतो, तरी त्यांची अवहेलना करून फसवणूक व पिळवणूक केली जाते.त्यांच्यावर होणारा जुलमी अत्याचार रोखण्याचे कार्य या राष्ट्रात संविधानिक मार्गाने प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.

जलनीती च्या माध्यमाने जलसंवर्धनाचे राष्ट्रातील सर्वात मोठे कार्य हाती घेऊन मोठ-मोठे जलप्रकल्प राष्ट्रहीता पोटी व समाजाच्या उन्नतीकरिता उभे केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऊर्जामंत्री असताना ऊर्जा निर्मिती, वितरण, नियंत्रण, उपयोग व त्याचा सर्वांना सक्षम लाभ घेता यावा,याकरिता दूरदृष्टीतात्मक विचार जोपासून राष्ट्राला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे कार्य केले. राष्ट्रातील सर्व स्त्रियांच्या हक्काच्या बाबतीत हिंदू कोड बिल रचना निर्मिली, स्त्रियांच्या हक्कासाठी, त्यांच्या सन्मानासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी खरे कार्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचेच नेते नव्हते तर दलितेतरांसाठी मानवी हिताचे कार्य करणारे व राष्ट्रहित जोपासणारे महान नेते होते. समाजातील शोषित, पीडित, वंचित, दलितांना मूलभूत हक्क मिळवून दिले. त्याबरोबर त्यांचा अधिकार ही त्यांना प्राप्त करून दिला. त्यांना त्यांचा सन्मान मिळवून दिला व त्यांचे मागासलेपण दूर केले. इथल्या अल्पसंख्यांकांना त्यांचे संरक्षण मिळावे. त्यांना त्यांचे सांस्कृतिक, सामाजिक कार्य करता यावे.

त्याचा प्रचार प्रसार करता यावा.त्यांना त्यांचा अधिकार मिळावा याकरता कलम 29 व 30 मध्ये समावेश करून त्यांचाही सन्मान केला. संविधानाच्या उद्देशिकेमध्ये पहिल्याच लाईनमध्ये आम्ही भारताचे लोक म्हणून सर्व भारतीयांचा सन्मान केला. हा सन्मान कोणत्याही एका जाती-धर्माच्या, पंथाच्या व्यक्तीचा नसून, राष्ट्रांमध्ये जन्मास येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान आहे. हे प्रथम लक्षात घ्यावे लागेल आणि मग लक्षात येईल की, अनंत पैलूंचा सामाजिक योद्धा दलितेतरांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे महानायक व महामानव ठरतात. असे संबोधले आणि  क्रांतीबा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छाही व्यक्त केल्या. यावेळी महाराष्ट्रातील तमाम जनतेने सम्यक संकल्प फेसबुक लाईव्ह या पेज वरून ऑनलाईन उपस्थित राहून व्याख्यानमाला कार्यक्रमाचा लाभ घेतला.

No comments