Breaking News

शिरूर शहरातील सात दुकाने आठ दिवस सील!

शिरूर कासार :  लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळून इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश शासन- प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. मात्र आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे व नियमांचे उल्लंघन करून शिरुर कासार शहरात काही दुकानदारांनी आपले दुकान चालू केल्याने आठ दिवसांसाठी ती दुकाने सील करण्यात आली असून ही कारवाई बुधवारी (दि.१४) सकाळी महसूल, पोलिस व नगर पंचायत प्रशासनाकडून संयुक्तरित्या करण्यात आली आहे. 

महाराष्ट्रात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढू लागल्याने कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द लॉकडाऊन केला आहे. लॉकडाऊनदरम्यान अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडण्यास शासनाने परवानगी दिली असून अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिलेत. मात्र शिरुर कासार शहरात काही दुकानदारांनी आपली शासनाच्या आदेशाचे पायमल्ली करून आपली दुकाने उघडल्याचे बुधवारी (दि.१४) सकाळी तहसिलदार श्रीराम बेंडे यांना शहरात पाहणी करताना निदर्शनास आले.

यावेळी त्यांनी संबधीत दुकानदारांवर कारवाई करून आठ दिवस सात दुकाने सील करण्यात आली आहेत. यामध्ये कापड, चप्पल, इलेक्ट्रिकल, आटोमोबाईल, जनरल, मोबाईल शॉपी या दुकानांचा समावेश आहे. तसेच काही हॉटेलमध्ये नागरीकांची गर्दी झाल्याचं पाहून तहसीलदार बेंडे यांनी हॉटेल तात्काळ बंद करा नाहीतर कारवाई करण्यात येईल अशी सक्त ताकीद दिली. ही कारवाई महसूल, पोलिस, नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या केली.

प्रशासनाला सहकार्य करा- तहसीलदार श्रीराम बेंडे 


कोरोना व्हायरस हा जीवघेणा असून प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतेय. कोरोना विषाणूची साखळी खंडीत करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन तहसीलदार श्रीराम बेंडे यांनी केले आहे. 

No comments