Breaking News

सामाजिक जाणिवेतून कोविड केअर सेंटर उभारले : अमरसिंह पंडित


जयभवानीत २०० खाटांच्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन संपन्न 

गेवराई : सामाजिक जबाबदारी आणि कर्तव्य समजून हे कोविड केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे, आजार अंगावर काढून रुग्णांच्या निष्काळजीपणा मुळे स्कोअर वाढत असून ही चिंतेची बाब आहे, त्यासाठी गावागावात जाऊन जनजागृती करुन लक्षणे दिसणा-यांनी तातडीने चाचणी करुन घेण्याचे आवाहन करत गेवराई तालुक्यात रुग्ण वाढू नये अशी अपेक्षा माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी व्यक्त केली. गेवराई येथील जयभवानी शिक्षण संकुलात शारदा हाँस्पिटल व रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कोविड केअर सेंटरचे लोकार्पण करताना ते बोलत होते. 

कोविड पॉझिटीव्ह रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात खाटा मिळत नसल्याच्या पार्श्‍वभुमीवर गेवराई तालुक्यातील जयभवानी शिक्षणसंकुलात २०० खाटांचे कोविड केअर सेंटर माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी सुरु केले असून पहिल्या टप्प्यात १०० खाटांचे सेंटर कार्यान्वित करुन त्याचे लोकार्पण शनिवार दि.१७ एप्रिल रोजी झाले. यावेळी माजी आमदार अमरसिंह पंडित, नायब तहसिलदार प्रशांत जाधवर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम, वैद्यकीय अधिक्षक डॉ. महादेव चिंचोळे, सहा. पोलीस निरीक्षक संदीप काळे, गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप आदी मान्यवर उपस्थित होते. कोरोना विषयक सर्व नियमांचे काटेकोर अंमलबजावणी करत हा समारंभ झाला. अतिशय प्रशस्त जागेत कोविड केअर सेंटर सुरू करताना येथील रुग्णांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रुग्णांच्या मनोरंजनासाठी टिव्ही, दररोज वर्तमानपत्र, मोबाईल चार्जिंग पॉईंट, वायफाय यासह चांगल्या दर्जाचे बेड, गादी व इतर सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. ऑक्सिजनचे विस बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. लवकरात लवकर रुग्ण बरा व्हावा या दृष्टीने येथे सुविधा निर्माण केल्या आहेत.


गोदावरी नदीला आलेला महापूर असेल किंवा इतर संकटकाळी शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी म्हणून आजवर जनतेची सेवा केली. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात सुद्धा आरोग्य यंत्रणेला साहित्य व गरजूंना जीवनावश्यक साहित्य वाटप करू शकलो, कोणतीही शासकीय आर्थिक मदत न घेता अतिशय कमी कालावधीत हे कोविड केअर सेंटर उभारताना रुग्णांना सुविधा मिळाव्यात हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून काम केले. या कोविड केअर सेंटर मधील बेड कधीच पूर्ण क्षमतेने भरू नयेत हीच भवानी चरणी प्रार्थना करत असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम म्हणाले की, अडचणीच्या काळात प्रशासनाला कायम सहकार्य करण्याची भुमिका अमरसिंह पंडित घेत असतात त्यांनी अतिशय सुसज्ज असे कोविड केअर सेंटर उभा करुन आरोग्य विभागाला मोठे सहकार्य केले आहे.सहा पोलीस निरीक्षक संदीप काळे म्हणाले की, प्रशासनाला या केअर सेंटरची खुप मदत मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना डॉ. चिंचोले म्हणाले की, गेवराई तालुक्याचे आरोग्य सांभाळण्यासाठी अमरसिंह पंडित यांनी खुप मोठे पाऊल उचलले असून सुसज्ज केअर सेंटर उभा करुन आपले कर्तव्य पार पाडले आहे तर नायब तहसिलदार प्रशांत जाधवर म्हणाले की, ज्यांच्या नावातच सिंह आहे नावाप्रमाणेच त्यांनी सामाजिक कामातही सिंहाचा वाटा उचलला आहे.

कोविड केअर सेंटर येथे कर्तव्यावर असलेल्या सर्व स्टाफचे यावेळी स्वागत करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, सभापती जगन पाटील काळे, आरोग्य विभागाचे डॉ. भारत नागरे, डॉ. लगड, डॉ. वैभव, डॉ. शरद पवार, डॉ. आश्विनी देशमुख , आनिता निर्मळ, शितल निसर्गध यांच्यासह पारिचारीका उपस्थित होते.

No comments