Breaking News

अत्यवस्थ रुग्णांना बेड मिळत नसल्याने जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा संतप्त....!


स्वाराती रुग्णालयासमोर केले धरणे आंदोलन
संपर्कास टाळाटाळ करणाऱ्या अधिष्ठातांना धरले धारेवर

शिवाजी भोसले । अंबाजोगाई 
 
लोखंडी सावरगावच्या कोविड सेंटरमध्ये कोरोनामुळे अत्यवस्थ झालेल्या २२ रुग्णांना पुढील अत्यावश्यक उपचारांसाठी स्वाराती रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात दाखल करणे गरजेचे होते. परंतु यापूर्वीच वारंवार सूचना करूनही स्वारातीच्या सुस्त प्रशासनाने वाढीव कोरोना आयसीयू बेडची तयारी ठेवली नसल्याने तिथेही बेड शिल्लक नव्हते. त्यातच अधिष्ठातांनी कॉल न स्वीकारून संपर्कात राहणे टाळल्याने संतप्त झालेले ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी बुधवारी स्वाराती रुग्णालयासमोर धरणे आंदोलन करत अधिष्ठातांना धारेवर धरले.
अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाचे पॉझिटिव्ह ची संख्य दिवसेंदिवस वाढू लागल्याने तालुका कोरोनाचे हॉटस्पॉट बनला आहे. सर्वात शेवटी कोरोनाची एन्ट्री झालेल्या अंबाजोगाई तालुक्यात आता प्रतिदिन २२५ च्या जवळपास रुग्ण सापडत आहेत. त्यातच बीड जिल्ह्यातील केज, धारूर, माजलगाव, परळी, वडवणी तसेच जिल्ह्यालगत असलेल्या गंगाखेड येथील रुग्ण देखील अंबाजोगाईला येत असल्याने स्वाराती रुग्णालय आणि लोखंडीचे जम्बो कोविड सेंटर रुग्णांनी खचाखच भरले आहे. ही परिस्थिती कधी ना कधी येणार याचा अंदाज असल्याने आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी वारंवार स्वाराती रुग्णालय प्रशासनाला डॉक्टर. कर्मचाऱ्यांची संख्या. ऑक्सिजन आणि आयसीयू बेड वाढविण्यासाठी सूचित केले होते. परंतु, रुग्णालयाकडून नेहमीच दिशाभूल करणारी बेडची आकडेवारी देण्यात आली. आता कोरोनाचा उद्रेक झाल्याने स्वाराती रुग्णालयावर मोठा ताण आला आहे. यात डॉक्टरांची कमतरता, रिक्त असलेल्या पदसंख्या या सर्व गोष्टींमुळे स्वाराती प्रशासन हतबल झाले आहे. 
बिघडलेली परिस्थिती निवारण्यासाठी वेळीच उपाययोजना करण्याऐवजी तहान लागल्यावर आड खोदण्याचा प्रयत्न प्रशासनकडून लागला आहे. लोखंडीच्या कोविड सेंटरमध्ये अत्यवस्थ झालेल्या रुग्णांना देखील स्वाराती रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात येते. मंगळवारपासून येथे अत्यवस्थ झालेले २२ रुग्ण नंदकिशोर यांच्या माध्यमातून स्वरातीच्या आयसीयूमध्ये बेड मिळण्याच्या प्रतीक्षेत होते. परंतु, तिथे जागा शिल्लक नसल्याने रुग्ण हवालदिल होत असल्याचे पाहून मुंदडा यांनी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्याकडे बेड उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा सुरु केला. परंतु, बुधवारी सकाळी सुक्रे यांनी मुंदडा यांचे कॉल घेण्याचे टाळले तर अक्षय मुंदडा यांच्या कॉलनंतरही भेटण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे संतप्त झालेले नंदकिशोर आणि अक्षय मुंदडा यांनी समर्थकांसह स्वाराती रुग्णालयासमोर तीन तास ठिय्या दिला. यावेळी मुंदडांनी बेड, ऑक्सिजन यावरून अधिष्ठाता सुक्रे यांना धारेवर धरले. प्रशासनाकडून उपाययोजनांचे ठोस आश्वासन मिळत नसल्याने आंदोलन चिघळेल या भीतीपोटी पोलीस दल पाचारण करण्यात आले होते. परंतु मुंदडा यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन अधिष्ठातांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात मुंदडा यांच्यासह सभापती मधुकर काचगुंडे, नेताजी शिंदे, महादेव सूर्यवंशी, माजी उपनगराध्यक्ष सारंग पुजारी, एड. संतोष लोमटे, खलील मौलाना, शेख ताहेर, बाला पाथरकर, बळीराम चोपणे, अनंत अरसुडे, नूर पटेल यांच्यसह शेकडो समर्थकांनी सहभाग घेतला या आंदोलनात मुदडा याचसह सभापती मधुकर काचगुंडे, नेताजी शिंदे, महादेव सूर्यवंशी, माजी उपनगराध्यक्ष सारंग पुजारी, ॲड. संतोष लोमटे, खलील मौलाना, शेख ताहेर, बाला पाथरकर, बळीराम चोपणे, अनंत अरसुडे, नूर पटेल यांच्यसह शेकडो समर्थकांनी सहभाग घेतला.
आंदोलनानंतर प्रशासन लागले कामाला
स्वाराती रुग्णालयातील कोरोना रुग्णांच्या समस्यांवर आंदोलन केल्यानंतर प्रशासन कामाला लागले असून त्या रुग्णांना अत्यावश्यक सुविधा देण्यासाठी प्रयत्न करू लागले आहेत. परंतु, भाजप नेते मुंदडा यांच्या आंदोलनानंतरच प्रशासन जागे झाले असले तरी यापूर्वी सूचना करूनही उपाययोजना का केल्या नाहीत असा सवाल अंबाजोगाईकर विचारत आहेत.
सूचना करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष - आमदार नमिता मुंदडा
संभाव्य बिकट परिस्थिती लक्षात घेऊन आपण वेळोवेळी स्वाराती प्रशासनासह जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला उपाययोजना राबविण्यासाठी सूचना केल्या होत्या. त्याकडे दुर्लक्ष केल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. वेळीच उपाययोजना केल्या असत्या तर रुग्णांची हेळसांड झाली नसती. औषधासह ऑक्सिजन दोन दिवस पुरेल एवढा साठा असेल तर आजपासूनच त्याच्या उपलब्धतेसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
ऑक्सिजन आणि बेडची कमतरता भासू देणार नाही स्वाराती रुग्णालयात रुग्णसंख्या वाढत असून त्यांना आरोग्यविषयक सुविधा मिळवून देण्यासाठी स्वाराती प्रशासन संपूर्ण प्रयत्न करत आहे. रुग्णालयात सध्याच्या दोनशे व्यतिरिक्त आणखी ९० खाटा आणखी तयार करण्यात येत असून त्यात ६६ खाटांना ऑक्सिजन व आवश्यकतेनुसार व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. नव्याने उपलब्ध करण्यात येत असलेल्या ९० खाटा तयार झाल्यास कोरोना रुग्णांना दिलासा मिळेल.
या वार्डात सध्या ऑक्सिजन सुविधा बसविणे सुरु असून काही दिवसातच संपूर्ण इमारत कोरना रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहे. कोणताही रुग्ण आरोग्य सुविधेपासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
- डॉ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता, स्वाराती रुग्णालय
वाढत्या मृत्यूंना जबाबदार कोण?

स्वाराती रुग्णालयातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक आहे. रुग्णालयात येण्यापुर्वीच रुग्ण अत्यवस्थ झालेला असतो, त्यामुळे उपचारासाठी वेळ मिळत नाही आणि रुग्ण दगावतो, परिणामी मृत्युदर जास्त दिसतो असे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले होते. मात्र, लोखंडीच्या रुग्णालयात अत्यवस्थ होत जाणाऱ्या २२ रुग्णांना स्वाराती रुग्णालयात बेड उपलब्ध करून द्यावेत यासाठी आपण सतत पाठपुरावा करूनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले, बेड उपलब्ध केले नाहीत. जर अत्यवस्थ रुग्णांना दाखलच करून घ्यायचे नसेल तर रुग्ण उशिरा रुग्णालयात येतो हा असा उलटा कांगावा कशासाठी? असा सवाल नंदकिशोर मुंदडा यांनी केला.

No comments