Breaking News

एआयएमआयएम आक्रमक


लॉकडाऊन
रद्द केले नाही तर रस्त्यावर निदर्शने, धरणे, मोर्चा आदी मार्गाने जनतेसह व्यापाऱ्यांना सोबत घेऊन राज्य शासनाच्या धोरणाविरोधात असहकार सुरू करणार - ॲड.शेख शफिक भाऊ   बीड : राज्यात लावण्यात आलेले 30 एप्रिल पर्यंत चे लॉकडाऊन रद्द केले नाही तर रस्त्यावर उतरून निदर्शने, धरणे, मोर्चा आदी मार्गाने जनतेसह व्यापाऱ्यांना सोबत घेऊन राज्य शासनाच्या  धोरणाविरोधात असहकार सुरू करणार असल्याचे प्रतिपादन एआयएमआयएम पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड.शेख शफिक भाऊ यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतल्यानंतर केले. या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत पक्षाचे जिल्हा प्रवक्ते हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी, एजाज खन्ना भाई होते. 

        राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 5 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत राज्यात पुन्हा एकदा लॉक डाऊन घोषित करण्यापूर्वी बीड च्या जिल्हाधिकाऱ्यांनी 26 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत जिल्हा लॉक डाऊन केला होता. याची मुदत संपते न संपते तोच मुख्यमंत्र्यांनी राज्यात पुन्हा एकदा लॉक डाऊन घोषित केले. यामुळे बीड जिल्हावासी शासन-प्रशासनाच्या या निर्णयांमुळे हैरान झाले आहेत. लॉक डाऊन लावताना शासन-प्रशासनाकडून  कुठल्याही प्रकार च्या सोयीसुविधा जनतेला देण्यात येत नाही. उलट जनता आपल्या पातळीवर करत असलेली कामे, छोटे-मोठे उद्योगधंदे शासन-प्रशासनाने लावलेल्या वारंवारच्या लॉक डाऊन मुळे बंद होऊन जनतेच्या उदरभरणाचा प्रश्न निर्माण  होत आहे. 
जनतेला दिलासा मिळेल असे कार्य शासन-प्रशासनाकडून होत नसल्याने गेल्या एक वर्षापेक्षा जास्त कालावधी पासून जनता हवालदिल झाली आहे. परंतु याचे कुठलेही सोयरसुतक सत्ताधाऱ्यांना नाही. म्हणून जनतेची ही अवस्था पाहता एआयएमआयएम पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफीक भाऊ यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत जनतेच्या समस्या मांडल्या परंतु शासन निर्देशाव्यतिरिक्त अन्य इतर काहीही करता येणार नाही असे म्हटल्याने यात जिल्हाधिकाऱ्यांचा दृष्टिकोन सकारात्मक दिसत असला तरी शासनाच्या कठोर निर्णयांची अंमलबजावणी करणे जिल्हाधिकाऱ्यांचे  कर्तव्य असल्याने तेही त्यांच्या पातळीवर जनहिताचा निर्णय घेऊन जनतेला दिलासा देऊ शकत नसल्याचे दिसत असल्याने आता जनतेसाठी एआयएमआयएम पक्षालाच रस्त्यावर उतरून राज्य शासनाच्या  धोरणाविरोधात असहकार सुरू करावा लागेल. असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष ॲड.शेख शफिक भाऊ यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर केले आहे.
एआयएमआयएम मुळे या दुकानांना परवानगी
जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा करून ॲड.शेख शफीक भाऊ यांनी ई-सुविधा केंद्र, सीएससी ऑनलाइन शॉप, चिकन-मटन या दुकानांना खुले ठेवण्याची परवानगी मिळविली.
   
पालकमंत्री आणि बीड चे आमदार अलिप्त 
कोरोना महामारी पेक्षा सर्वसामान्य गोरगरीब आणि व्यापारी आपल्या पोटाची खळगी भरण्याच्या विवंचनेत आहेत परंतु जनतेच्या समस्या, त्यांच्या अडचणी जाणून घेण्याकरिता ना पालकमंत्री धावून येत आहे ना बीडच्या आमदारांना याचे सोयरसुतक आहे. लोकप्रतिनिधी असूनही हे फक्त शासनाचेच प्रतिनिधी होऊन बसले आहेत. शासन जसे उंटावर बसून शेळ्या हाकू लागले आहेत त्यानुसार हे दोघं सुद्धा सत्तेतील आपापल्या भूमिका जनतेपासून अलिप्त राहुन वठवीत आहे. असेही ॲड.शेख शफिक भाऊ यांनी म्हटले आहे.
सत्ताधारी फक्त सत्तेची फळे खाण्यात मग्न 
केंद्र सरकार मध्ये पूर्ण बहुमत असलेले भाजप आणि सत्तेसाठी महाराष्ट्रात एकत्र येऊन शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे हे चारही पक्ष कोरोना काळात जनतेसाठी फक्त चांडाळ चौकडी म्हणून उघडे पडत असून हे सर्वजण मिळून फक्त सत्तेची फळे खाण्यात मग्न आहेत. अशी प्रतिक्रियाही ॲड. शेख शफीक भाऊ यांनी दिली आहे.
 
सरसकट सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस द्या
कोरोना वाढत आहे, सर्वदूर पसरला आहे, तो कुठपर्यंत पसरणार व कुठपर्यंत टिकणार याची माहिती ना आरोग्य विभागाकडे आहे ना सत्ताधाऱ्यांकडे आहे. तरीपण शासन-प्रशासन वारंवार लॉक डाऊन लाऊन जनतेला वेठीस धरत आहे. हे कुठेतरी थांबायला हवे. रोगापासून वाचण्याकरिता लॉक डाऊन करणे कोणत्याही दृष्टिकोनातून संयुक्तिक नाही. लॉक डाऊन ऐवजी सरसकट कोरोना प्रतिबंधक लस प्रत्येकाला देण्याचे नियोजन व्हायला हवे. असे मतही ॲड.शेख शफिक भाऊ यांनी मांडले आहे. 

No comments