Breaking News

भाजपा नेत्या पंकजा मुंडेंना करोनाची लागण “पंकजाताई मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे,” धनंजय मुंडेंनी दिला फेसबुक पोस्टद्वारे धीर..!

मुंबई : भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना करोनाची लागण झाली आहे. पंकजा मुंडे यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. करोना संसर्ग झालेल्या अनेक रुग्णांच्या कुटुंबीयांची भेट घेतली असल्याने आपल्यालाही लागण झाली असल्याची शक्यता पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे. पंकजा मुंडे यांनी यावेळी आपल्या संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे.

पंकजा मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. मी आधीच काळजी घेत असून विलगीकरणात आहे. मी अनेक लोकांना तसंच करोना रुग्णांच्या कुटुंबीयांची भेट घेतली असून त्याद्वारे संसर्ग झाला असावा. माझ्यासोबत जे होते त्यांनीदेखील चाचणी करुन घ्या..काळजी घ्या”.

पंकजाताई मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे,” धनंजय मुंडेंची फेसबुक पोस्ट 

“पंकजाताई, करोना विषाणूचा सामना मी दोनवेळा केलाय, यामुळे होणाऱ्या त्रासाची मला जाणीव आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने योग्य उपचार घ्या. घरच्या सर्वांची टेस्ट करून घ्या, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच. प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकरच बऱ्या व्हाल, काळजी घ्या ताई,” असं धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे.

दरम्यान २४ एप्रिलला शनिवारी संध्याकाळी भाजपा खासदार आणि पंकजा मुंडे यांच्या धाकट्या बहीण प्रीतम मुंडे यांनी प्रकृती अस्वस्थ्य जाणवत असल्यामुळे उपचार घेत असल्याचा व्हिडिओ ट्वीटरवर पोस्ट केला होता. त्यावर महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांच्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या होत्या. 

No comments