Breaking News

मरणा पूर्वीचाच माणूस असतो खरा; बाकी नुसता धूर आणि धुरळा...!


आठवडा लोटला तरी कुणी अस्थी आणि राख विसर्जनाविना पडून ! : नातेवाईक किंवा कुटुंबियांकडून मृत्यू नंतरही अवहेलना !

मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते !"

गौतम बचुटे । केज 

मराठी गझलकार सुरेश भट यांनी त्यांच्या एका गझलेत म्हटले आहे की, "इतकेच मला सरणावर जाताना कळले होते; मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते" अगदी तशीच अवस्था केज येथील सार्वजनिक स्मशानभूमीत मागील आठवड्यात दोन कोरोना ग्रस्तांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झालेले आहेत. मात्र त्यांच्या अस्थी व राखेचे विसर्जन करण्यासाठी कुणी नातेवाईक किंवा कुटुंबीय पुढे न आल्यामुळे मरणा नंतरही त्यांची अवहेलना सुरूच आहे.

एखाद्या रुग्णांचा कोरोना रिपोर्ट जर पॉझिटिव्ह आला तर त्याच्या जवळ रुग्णालयातील उपचार करणारे डॉक्टर्स, नर्सेस आणि कर्मचाऱ्या शिवाय कुणीच जात नाही. दुर्दैवाने मृत्यू झाला तर नगर पंचायतीचे, नगर परिषद किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचे अंत्यसंस्कार संस्कार करणारे कर्मचारी हेच त्या मयताचे लौकिक अर्थाने वारस समजायला हवेत. कारण प्रेताला खांदा देणे, चिता रचणे शेवटी सर्व विधी, सोपस्कार पार पाडून भडाग्नी देखील तेच देतात. अशी सर्व परिस्थिती कोरोनामुळे उद्भवली आहे. केज येथील कानडी रोड लगतच्या स्मशान संपLभूमीत अशाच दोन दुर्दैवी घटना घडल्या आहेत. कोरोना उपचार घेणारे दोन वेगवेगळे रुग्ण दगावले.

 त्यातील एका मृतदेहावर केज नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले तर एका मृतदेहावर कोरोना केअर सेंटर मधील वॉर्ड बॉय यांनी अंत्यसंस्कार केले. यातील वास्तव आणि चीड निर्माण करणारी बाब ही की, एरवी कुटुंबातील कर्ता व्यक्ती मरण पावल्यास त्याचे क्रियाकर्म पार पाडून त्यांच्या संपत्तीचे वाटेकरी होण्यासाठी जो तो धडपडत असतो मात्र केज स्मशान भूमीत या दोन अभागी मयताच्या अस्थी व राख एक आठवड्यापासून तशाच पडून असून किमान त्यांच्या नातेवाईकांनी त्याचे विसर्जन करण्यासाठी पुढे यायला हवे होते परंतु मृत्यू नंतरही त्या दोन अभागी मृतातम्यांची अवहेलना कायम आहे.

म्हणून अशा परिस्थिचे वर्णन आपल्या रचनेत कवविवैर्य गझलकार सुरेश भट यांनी म्हटले आहे की,

 "इतकेच मला 

सरणावर जाताना कळले होते; 

         मरणाने केली सुटका 

जगण्यानेही छळले होते !"

तसेच विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांनी त्यांच्या कवितेत म्हटले आहे की,

    "मरणापूर्वीचाच माणूस 

                  असतो खरा

                   बाकी नुसता 

               धूर आणि धुरळा !"

१. प्रेताचे दहन करून अंत्यविधी नंतर राख किंवा अस्थी यांच्या संपर्कात आल्याने कोरोनाचा संसर्ग किंवा फैलाव होत नाही. 

२. अशा प्रकारे जर घटना घडत असतील त्या ठिकाणी सामाजिक संस्था किंवा सामाजिक भान असणाऱ्या व्यक्तींनी पुढे येऊन सोपस्कार पूर्ण करायला हवे.

३. अस्थी व राख न जमा केल्यामुळे त्या जागेवर दुसरा अंत्यसंस्कार करता येत नसल्यामुळे जागेची अडचण निर्माण होते.

No comments