Breaking News

गेवराईत कोरोना बाधित रुग्णांसाठी धावणार 'शिवछत्र रुग्णवाहिका'


सभापती सविता बाळासाहेब मस्के यांची सामाजिक बांधिलकी ; स्वतःची स्कार्पिओ आरोग्य प्रशासनाकडे सुपूर्द

गेवराई : कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सध्या पाँझिटीव्ह रुग्णांना रुग्णालयात जाण्यासाठी अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान वेळेवर रुग्णालयात जाता न आल्याने रुग्णांची प्रकृती चिंताजनक होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हि रुग्णांची गैरसोय लक्षात घेता गेवराई तालुक्यातील रेवकी जिल्हा परिषद गटाच्या सदस्या तथा जिल्हा परिषद सभापती सविता बाळासाहेब मस्के यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली स्वतःची स्कार्पिओ गाडी (शिवछत्र कोविड रुग्णवाहिका) हि रुग्णांना रुग्णालयात तात्काळ जाण्यासाठी तहसीलदार सचिन खाडे यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागाकडे रविवारी सुपूर्द केली असून यामुळे रुग्णांची गैरसोय दूर होणार आहे. तर कोरोनासारख्या परिस्थितीत जिल्ह्यात सर्वप्रथम सभापती सविता मस्के यांनी स्वतःची गाडी रुग्णांसाठी देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

    कोरोना या संसर्गजन्य रोगांने जनजीवन विस्कळीत केले आहे. सध्या या महामारी आजाराचा मोठ्या प्रमाणात उद्रेक वाढला आहे. त्यातच या आजाराच्या भितीने काही जण अंगावर दुखणे काढत असल्याने त्यांचा स्कोर वाढत आहे. तर ज्या लोकांना कोविडची लक्षणे जाणवू लागतात, ते रुग्ण रुग्णालयात जाण्यासाठी गाडी मिळत नाही यासह इतर गैरसोईमुळे घरीच बसून राहत आहेत. त्यातच त्यांची परिस्थिती गंभीर बनत असल्याने यामध्ये काही रुग्ण मृत्यूमुखी पडत आहे. गेवराई तालुक्यात देखील काही रुग्णांची रुग्णालयात जाईपर्यंत खुपच गंभीर परिस्थिती निर्माण होऊन त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. गावाकडे लक्षणे दिसली तर रुग्णालयात जाण्यासाठी गाडी उपलब्ध होत नाही. तरी हि परिस्थिती लक्षात घेऊन लोकांमध्ये कोरोनासंदर्भात जनजागृती करुन वेळीच उपचार घेतल्यास त्यावरती मात करु शकतो या उदात्त हेतूने या गटाच्या सदस्या तथा जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती सविता बाळासाहेब मस्के यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली स्वतःची स्कार्पिओ गाडी तालुक्यातील रुग्णांसाठी रविवारी तहसीलदार सचिन खाडे यांच्या उपस्थितीत येथील वैद्यकीय अधिक्षक एम.व्ही.चिंचोळे यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी नगरसेवक राधेशाम येवले, राष्ट्रवादीचे युवक तालुका अध्यक्ष ऋषीकेश बेदरे, डॉ. राजेश शिंदे, डॉ. सराफ, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार, आदींची उपस्थिती होती. 

 


   तरी रेवकी गटातील नागरिकांनी कोरोनाचे लक्षणे दिसताच निसंकोचपणे संपर्क साधावा, त्यांच्यासाठी आरोग्य प्रशासनाकडे सुपूर्द केलेली 'शिवछत्र रुग्णवाहिका 24 तास' त्यांच्या सेवेत उपलब्ध असेल, यासाठी रुग्णवाहिकाचे ड्रायव्हर शिवाजी काळे यांना 9405161111, 7796525111 या नंबरवरती संपर्क साधावा असे यावेळी सभापती सविता मस्के यांचे पती बाळासाहेब मस्के यांनी सांगितले. तर सध्या कोरोना सारख्या आपत्तीजन्य परिस्थितीत आरोग्य विभागावर मोठा ताण पडत असून सभापती सविताताई मस्के यांनी समाजाप्रती दाखविलेल्या दायित्वाबद्दल नक्कीच रुग्णांना फायदा होईल, शिवाय आरोग्य विभागाला देखील मदत निर्माण होईल असे वैद्यकीय अधिक्षक एम.व्ही.चिंचोळे यांनी सांगितले. यावेळी अॅड. श्रीनिवास ढाकणे, शिवाजी काळे, रमेश जामकर, उप सरपंच रामेश्वर पवार, अमजद शेख, ज्ञानेश्वर अरबड, अभिषेक फुलारे, सिद्धेश धांडे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान सभापती सविता मस्के व बी.एम.प्रतिष्ठाणचे अध्यक्ष बाळासाहेब मस्के यांनी नेहमीच संकटकाळात समाजाचे काही देणे लागतो, या उदात्त हेतूने सर्वतोपरी मदत केली आहे. सध्या कोरोनाच्या भिषण संकटात रुग्णांसाठी स्वतःची गाडी देऊन एकप्रकारे सामाजिक बांधिलकी जोपासली असून इतर राजकारण्यांनी देखील अशा संकटात आरोग्य प्रशासनाला सहकार्य केल्यास त्यांच्यावरील ताण कमी होईल, शिवाय रुग्णांना वेळीच उपचार होण्यास मदत होईल.

No comments