Breaking News

शिक्षकांनी कोरोना काळात निर्भयपणे राहून आरोग्य संभाळावे- शिक्षक नेते प्रा.सुनिल मगरे यांचे प्रतिपादन


मुप्टा संघटनेच्या वतीने शिक्षक संवाद ऑनलाइन वेबिनार  संपन्न

बीड : शिक्षक प्राध्यापकांनी अधिक सजग राहून कोव्हिडचे सर्व नियम पाळून निर्भयपणे राहात आपले आरोग्य सांभाळावे.मुप्टा हे आपले कुटुंब आहे.या महामारीच्या काळात स्वताला एकटे समजू नये,मुप्टा संघटना आपल्या सोबत आहे.या काळातही शिक्षक प्राध्यापकांवर होणार्या अन्याय अत्याचाराविषयी सजग राहून मुप्टाच्या पदाधिकार्यांनी काम करावे.बीड जिल्हा मुप्टा संघटनेच्या वतीने मराठवाड्यातील प्रमुख पदाधिकार्यांच्या शिक्षक संवाद ऑनलाइन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शिक्षक नेते प्रा.सुनिल मगरे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.


यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, मुप्टा शिक्षक संघटना शिक्षक प्राध्यापकांचे प्रश्न धसास लावण्यासाठी आपल्या नाविन्यपूर्ण आंदोलने आणि आक्रमक शैलीमुळे सर्वदूर शिक्षकप्रिय होणारी संघटना आहे.आजपर्यंत संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुखदुखात संघटना सोबत राहिली आहे.संघटनेच्या नेतृत्वाने ही बांधिलकी प्रारंभापासून जपली आहे.

   आज कोव्हिड 19 च्या प्रादूर्भावामुळे वर्तमान परिस्थिती बिकट आहे.समाजजीवन अस्वस्थ आहे.माणसाचे मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्य बिघडले आहे .या पार्श्वभूमीवर शिक्षक प्राध्यापकांचे प्रश्न,अडचणी समजून घेऊन आजच्या परिस्थितीच्या अनुषंगाने जाणिव जागृती निर्माण व्हावी, आपण सर्वजण संवादी राहावे,यासाठी सदरील शिक्षक संवाद ऑनलाइन वेबिनार आयोजन करण्यात आले असल्याचे ते म्हणाले.

या वेबिनारच्या सुरवातीला कोरोना काळात निधन झालेल्या कुटुंबियांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेबिनारच्या अध्यक्षस्थानी बीड जिल्हा मुप्टा संघटनेचे अध्यक्ष प्रा.प्रदिप रोडे हे होते.ते म्हणाले की,शिक्षकांनी सकारात्मकता बाळगून चांगला आहार,व्यायाम आणि ध्यान करावे.विपश्यनेमधे खुप मोठी शक्ती आहे.आपले मानसिक आरोग्य निरोगी राहण्यासाठी ध्यानधारणा हा उत्तम उपाय आहे.त्याचा उपयोग करून आपण मानसिक मरगळ दूर करु शकतो.

प्रा.डॉ.मनोहर सिरसाट यांनी प्रारंभी प्रास्ताविकपर मनोगतातून या ऑनलाइन वेबिनार आयोजनामागील भुमिका विशद केली. या वेबिनारमधे प्रा.डॉ.पंचशील एकम्बेकर नांदेड,प्रा.डॉ.हर्षवर्धन कोल्हापुरे लातूर,प्रा.भास्कर टेकाळे,शिवराम म्हस्के औरंगाबाद,शरद मगर बीड यांनी आपला सहभाग नोंदवित मनोगते व्यक्त केली.यावेळी अतिरिक्त  शिक्षक समायोजनाचा प्रश्न,विनाअनुदानाचा विषय,कोरोना काळातील वैद्यकीय बिलाचा प्रश्न,जुनी पेन्शन योजना,नवे शैक्षणिक धोरण,डीसीपीएसचे हप्ते जमा न होणे,मुप्टाच्या वतीने शिक्षकांचे वैचारिक प्रबोधन होण्यासाठी मुप्टा प्रबोधन हा ऑनलाइन फोरम स्थापन करणे,सभासद नोंदणी या विषयावर सविस्तर चर्चा करून काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने मराठवाड्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.या वेबिनारचे संयोजन आणि आभार प्रा.डॉ.मनोहर सिरसाट यांनी मानले.


No comments