Breaking News

मानवी जीवनाच्या कल्याणाचा मार्ग बुद्धाच्या धम्मात : भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो

बीड :  भारतीय जनमानसात व त्यांच्या राहणीमानात वेगळेपणा दिसून येतो, त्यांच्या संस्कृत, धार्मिक व्यवस्थापनेचे वेगळेपण आणि त्यातून उदयास आलेले कर्मकांड यामुळे व्यक्तीची आपापसातली आपुलकीची भावना दुभांगली व मनातील भेद दुरावत गेले त्यामुळे मानवाच्या जीवनात दुःखाशिवाय काहीही उरले नाही. हाच दुःख मुक्तीचा मार्ग आम्हाला तथागत भगवान गौतम बुद्धांनी दाखवला. 

तथागतांनी आम्हाला विज्ञानवादी व वास्तवता दर्शवणारा मार्ग दाखवला. मानवी जीवनाचे कल्याण करण्यासाठी सिद्धार्थ गौतम बुद्धाने आपले राजवैभव सोडून दिले आणि शील, सदाचार,नीतिमत्ता या धम्माच्या आधारभूत विचाराची मानवी मनात पेरणी करून त्यांचे जीवन सुखमय केले, म्हणूनच मानवी जीवनाच्या कल्याणाचा मार्ग बुद्धाच्या धम्मात आहे, असे मत भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो (पूर्णा) यांनी व्यक्त केले. क्रांतीबा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने प्रियदर्शी धम्म संस्कार शिक्षण संस्था बीड व सम्यक संकल्प समता पर्व बीड यांच्या संयुक्त विद्यमाने दि.11 एप्रिल 2021 ते 17 एप्रिल 2021 दरम्यान सायंकाळी 8:00 वाजता व्याख्यानमालेचे आयोजन सम्यक संकल्प फेसबुक लाईव्ह, ऑनलाइन पद्धतीने केले आहे. या कार्यक्रमाप्रसंगी व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना ते आपले मत व धम्मदेशना व्यक्त करत होते.

यावेळी पुढे बोलताना भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो म्हणाले की,या अगोदर भारत भूमीवर अनेक वेळा महामारी च्या आजाराने थैमान घातलेले आहे.त्या त्या वेळी ते सर्व आजार रोखताणा  केवळ मानवजातीचा विचार करूनच ते रोखता आले. त्यावेळी वेगवेगळ्या धर्माच्या कर्मकांडांचे अथवा त्यातील थोतांड विचाराचा केव्हाही काहीही फायदा अथवा मदत झाली नाही. कर्मकांडातील सर्व कल्पना निरर्थक ठरतात. मात्र अशावेळी केवळ आणि केवळ बुद्धाचा विज्ञान वादी विचार महत्त्वाचा ठरतो आणि तोच विचार सर्व काही दूषित घटना रोखण्यास मदत करतो.

 धर्माच्या नावावर मानवाला काल्पनिक जीवनात रंगवले जाते, वास्तव जीवनात त्याचा काहीही फायदा अथवा सबंध येत नाही.अशी धर्म खऱ्या अर्थाने अ-धम्म आहेत. क्रांतीबा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महापुरुष म्हणजे वास्तविक जीवन जगणारे व्यक्तिमत्त्व होते.त्यांनी धार्मिक अंध रूढी परंपरेचा विरोध करून बंड पुकारले आणि तथागत भगवान गौतम बुद्धाच्या विज्ञानवादी मार्गाचा स्वीकार करून मानव कल्याणकारी कार्य केले. मानवाच्या कल्याणाचे कार्य करणारे महापुरुष निर्माण होतात तेव्हा महापुरुषांना जात नसते ,ते केवळ सर्वांच्या कल्याणाचा विचार करतात आणि त्या विचाराचे कार्यही करतात. अशा महापुरुषांच्या विचाराचा जागर होणे हे गरजेचे आहे. त्यांच्या विचारांमुळे पुढील भावी पिढी सुखकारक जीवन जगू शकते. कोवीड महामारी ने थैमान घातल्यापासून मानव जीवन हे दुःखी झाले आहे. वेगवेगळ्या प्रश्नांना तोंड द्यावे लागते,शिक्षणव्यवस्थेचा रास झाला, आम्ही एकमेकांपासून दूर झालेलो आहोत, हे संकट लवकरच संपुष्टात येऊन प्रत्येकाचे जीवन आनंदी व सुखमय होवो अशी मंगल कामना ही व्यक्त केली.

 यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राम गायकवाड यांनी केले, तर सम्यक संकल्प फेसबुक लाईव्ह पेजवर उपस्थित राहून महाराष्ट्रातील अनेक उपासक-उपासिका व चाहत्यांनी व्याख्यानाचा लाभ घेतला. पुढे दिनांक 17 एप्रिल 2021 पर्यंत रोज सायंकाळी 8:00 वाजता सम्यक संकल्प फेसबुक पेजवरून व्याख्यान सुरू राहणार आहे ,तेंव्हा व्याख्यानाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments