Breaking News

कारखाना येथील जलशुद्धीकरण केंद्राची प्रभारी नगराध्यक्ष राजकिशोर मोदींकडून पहाणी


अंबाजोगाईकरांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्याच्या दिल्या सूचना

शिवाजी भोसले । अंबाजोगाई  

कारखाना येथील जलशुद्धीकरण केंद्रास  गुरूवार,दिनांक ८ एप्रिल रोजी भेट देऊन प्रभारी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी त्या ठिकाणच्या जलशुद्धीकरण प्रक्रियेची पाहणी केली,तसेच नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागाला अंबाजोगाईकरांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी योग्य त्या सूचना दिल्या.

अंबाजोगाई शहरातील नळास पिवळसर रंगाचे पाणी येत असल्याचे काही नागरिकांकडून सांगण्यात आल्यामुळे अंबानगरीचे प्रभारी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी गुरूवारी अंबाजोगाई सहकारी कारखान्या नजीकच्या जलशुद्धीकरण केंद्रास भेट देऊन त्या ठिकाणच्या जलशुद्धीकरण प्रक्रियेची पाहणी केली.पिण्यासाठी स्वच्छ पाणी देण्याच्या योग्य त्या सूचना केल्या.याप्रसंगी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते अनिसभाई अन्सारी,सामाजिक कार्यकर्ते सुनील व्यवहारे,नगरपरिषदेतील पाणीपुरवठा विभागातील अरूण कुरे,श्री गोस्वामी व इतर कर्मचारी उपस्थित होते.

अंबाजोगाई शहरातील नागरिकांना जाहीर आवाहन

अंबाजोगाई शहरातील नागरिकांना सूचित करण्यात येते की,शहराला धनेगाव धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो.मागील काही दिवसांपासून अंबाजोगाई शहरात पिवळसर रंगाचे पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत आहेत.नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत यासाठी उपाययोजना करण्यात आल्या असून पाण्याचा रंग जाण्यासाठी तुरटीचे तसेच क्लोरीनचे प्रमाण ही वाढविण्यात आले आहे.शहरातील विविध ठिकाणच्या पाण्याचे नमुने हे बीड येथील शासकीय आरोग्य प्रयोगशाळेत तपासणी करिता पाठविले आहेत.त्या सर्व ठिकाणचे पाणी नमुने तपासणी नंतर सदरील पाणी हे पिण्यास योग्य असल्याचे अहवाल नगरपरिषदेला प्राप्त झाले आहेत.शहरात ज्या-ज्या ठिकाणी पाणीपुरवठा होत आहे.तेथील नळाच्या पाण्याचे ओ टी () तपासण्यात येत आहे. तसेच नागरिकांना शुध्द पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक ती दक्षता नगरपरिषद घेत आहे.नागरिकांना याद्यारे जाहीर सूचित करण्यात येते की,नगरपरिषदेकडून केला जाणारा पाणीपुरवठा पिण्यास योग्य आहे.याबाबत काही शंका अडचण निर्माण झाल्यास नागरिकांनी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे संपर्क करावा असे आवाहन मुख्याधिकारी,नगरपरिषद,अंबाजोगाई यांनी केले आहे.

पिण्यायोग्य करून पाणी नागरिकांपर्यंत पोहोचविले जाते

अंबाजोगाईत अनेक भागांमध्ये पिवळसर रंगाचे पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत.त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गाळून आणि उकळून पाणी वापरावे असे आवाहन नगरपालिकेने केले आहे.धनेगाव येथील मांजरा धरण परिसरातील पाणी पातळी दरवर्षी उन्हाळ्यात कमी होत असल्याने पाणी उपसा करणा-या पंपाद्वारे प्रसंगी धरणातील गाळमिश्रीत पाणी उपसा होतो.पुढे ते पाणी जलशुद्धीकरण केंद्रात आल्यावर शुध्द करण्यात येते.पाण्याचा रंग जरी पिवळसर असला तरी या पाण्यावर नगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून,पाणी पिण्यायोग्य करून ते नागरिकांपर्यंत पोहोचविले जात आहे.मात्र,त्यानंतरही प्रक्रिया केलेले पाणी हे काही प्रमाणात पिवळसर रंगाचे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे नागरिकांनी पाणी गाळून व उकळून वापरावे असे नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे.पाणी हा रोजच्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहे.आपण पाणी गाळून,तुरटी फिरवून त्याचा पिवळसरपणा घालवू शकतो,सर्वांनीच पाणी उकळून व गाळून घ्यावे.

राजकिशोर मोदी (प्रभारी नगराध्यक्ष, नगरपरिषद, अंबाजोगाई.)


No comments