Breaking News

पालकमंत्री धनंजय मुंडेंनी स्वाराती रुग्णालयास दिलेला शब्द पूर्ण केला; 42.60 लाख रुपये किंमतीच्या दोन डिजिटल रेडिओग्राफी आज होणार दाखल


एक आरटीपीसीआर युनिट व बायोसेफ्टी कॅबिनेट दाखल; जिल्हा नियोजनमधून दिले 25 लाख

अंबाजोगाईत प्रतिदिन आणखी 1200 चाचण्या वाढणार - डॉ. शिवाजी सुक्रे 

अंबाजोगाई : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांना बळ देण्याच्या दृष्टीने मागाल ते पुरवू असे धोरण राबवले आहे. अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयास मागील महिन्यात मागणी केलेल्या अद्ययावत डिजिटल एक्सरे (रेडिओग्राफी) मशिन्स आज रुग्णालय प्रशासनास प्राप्त होणार आहेत. या मशिन्सच्या खरेदीसाठी ना. मुंडेंकडून 42.60 लाख रुपये जिल्हा वार्षिक विकास योजनेतून उपलब्ध करून देण्यात आले होते. 

स्वाराती रुग्णालयात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी 15 लाख रुपये किमतीची आणखी एक आरटीपीसीआर मशीन व दहा लाख रुपयांचे बायोसेफ्टी कॅबिनेट देखील खरेदी करण्यात आले असून, या मशीन्स काल रात्री प्राप्त झाल्या आहेत. मागील आठवड्यात बीड येथे ना. मुंडेंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत स्वाराती ग्रामीण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी याबाबत मागणी केली होती, ही मागणी एका आठवड्याच्या आत मार्गी लागल्याने डॉ. सुक्रे यांनी समाधान व्यक्त केले आहे. एक आर टी पी सी आर मशीन वाढल्याने अंबाजोगाई येथे प्रतिदिन आणखी 1000 ते 1200 चाचण्या करता येतील. स्वाराती रुग्णालयातील एक्सरे मशीन दहा वर्ष जुनी होती, त्यामुळे एक्सरे बाबत अनेक तक्रारी होत्या, आता अद्ययावत डिजिटल रेडिओग्राफी मशिन्स आज ऊपलब्ध होत असल्यामुळे रुग्णांचे एक्सरे काही मिनिटात प्राप्त होणार आहेत व पर्यायाने कोरोनासह अन्य रुग्णांना देखील लवकर उपचार मिळणार आहेत; असेही डॉ. सुक्रे म्हणाले. 

ना. धनंजय मुंडे यांच्या पुढाकारारून परळी औष्णिक विद्युत केंद्रातील ऑक्सिजन प्लांट स्वाराती येथे शिफ्ट केला असून, याद्वारे जवळपास 290 ते 300 जम्बो सिलेंडर लिक्विड ऑक्सिजन एका दिवसात निर्माण होईल, त्यामुळे स्वाराती मध्ये आणखी ऑक्सिजन बेड वाढविता येणार असून हा प्लांट उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे, अशी माहिती डॉ. सुक्रे यांनी दिली आहे. स्वाराती मध्ये उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून, ना.मुंडेंच्या निर्देशानुसार 150 बेड वाढविण्यात आले आहेत तसेच आणखी 100 बेड वाढविण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

256 स्लाईस सिटी स्कॅन मशीनचा प्रस्ताव पाठवला

स्वाराती ग्रामीण रुग्णालयात पुणे, औरंगाबाद अशा मोठ्या शहरात उपलब्ध असलेली अद्ययावत 256 स्लाईस सिटी स्कॅन मशीन बसवावी, ग्रामीण भागातील रुग्णांना त्यासाठी मोठ्या शहरात जायला लागू नये, यासाठी धनंजय मुंडे यांनी 256 स्लाईस सिटी स्कॅन मशीन खरेदीचा प्रस्ताव दाखल करण्याचे निर्देश दिले होते, त्यानुसार हा प्रस्ताव जिल्हा प्रशासनामार्फत राज्य शासनाला पाठवला असून, ही मशीन लवकरच उपलब्ध करून देण्याचे आश्वासन धनंजय मुंडे यांनी दिले आहे, अशी माहिती डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दिली. 

No comments