Breaking News

संतापजनक : एकाच रुग्णवाहिकेत कोंबून नेले 22 कोरोना रुग्णांचे मृतदेह


अंबाजोगाईमध्ये धक्कादायक घटना उघड,   सर्वत्र संताप 

शिवाजी भोसले । अंबाजोगाई 

मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते... असं बऱ्याचदा म्हटलं जातं पण आज कोरोनाच्या संकट काळात मरणानंतर देखील कोरोना बाधितांची काही सुटका होत नसल्याचं धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे. तशाच स्वरुपाची एक अशी घटना आता समोर आली आहे. ज्यामुळे आपणही गलबलून जाल. बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात कोरोनामुळे मृत झालेल्या तब्बल 22 रुग्णांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीकडे नेण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

या प्रकारामुळे मरण पावल्यानंतरही कोरोना बाधितांची अवहेलना काही थांबत नसल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकारामुळे स्वाराती रुग्णालय प्रशासनाविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. बीड जिल्ह्यात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच अंबाजोगाई तालुक्यातील परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयावर प्रचंड ताण आहे. अशातच शेजारच्या सर्व तालुक्यातून देखील रुग्ण स्वाराती रुग्णालय इतर कोव्हिड सेंटरमध्ये दाखल होत आहेत. दुसरीकडे कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येसोबतच मृतांचेही प्रमाण प्रचंड वेगाने वाढत आहे.

कोरोनाची लागण झाल्याने अनेक रुग्णांना बेडपासून औषधांपर्यत सगळ्याच गोष्टीची मृत्यूनंतरही कोरोना रुग्णांच्या मृतदेहांची अवहेलना होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रविवारी (25 एप्रिल) दुपारी तब्बल 22 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे मृतदेह हे एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीकडे नेण्यात आले. हे सर्व मृतदेह यावेळी रुग्णवाहिकेत अक्षरशः कोंबले होते. मयत झालेल्या रुग्णांना अशा पद्धतीने अंत्यविधीसाठी नेण्याचा हा प्रकार अत्यंत धक्कादायक असून प्रशासनाविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. 


No comments