Breaking News

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातील शेकडो कोटींच्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी

आमदार अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत मागणी


मुंबई : राज्यात सत्तारूढ महाविकास आघाडी सरकार सर्व पातळ्यांवर चांगले काम करत असताना विरोधकांकडून मात्र भ्रष्टाचाराचे बेछूट आरोप केले जात आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षात शेकडो कोटींचा भ्रष्टाचार झालेला असून त्याची महाविकास आघाडी सरकारने कसून चौकशी लावावी अशी आग्रही मागणी विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर चर्चेच्यावेळी विधान परिषद आमदार मिटकरी बोलत होते. 

माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षात मार्च २०१५ ते ऑक्टोबर २०१९ या कार्यकाळात झालेल्या शेकडो कोटींच्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, असे पत्र मुख्यमंत्र्यांना दिलेले आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर ५२६ कोटी रूपये वितरित केल्याचे नमूद आहे, मात्र दुसरीकडे १५०० कोटी रूपये खर्च केल्याचा दावा केला जात आहे. ही तफावतच भ्रष्टाचार झाल्याची पावती देत आहे, असेही आमदार मिटकरी म्हणाले. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षात झालेल्या भ्रष्टाचाराची महाविकास आघाडी सरकारने कसून चौकशी करावी, अशी आग्रही मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली. दरम्यान, तत्कालीन कक्षप्रमुख ओमप्रकाश शेटे यांच्यासह दोषींवर शासनाने चौकशी करून कारवाई करावी अशी मागणीही मिटकरी यांनी लावून धरली आहे.

मंत्री सुभाष देसाई यांची आरोग्यमंत्र्याकडे तक्रार 

भाजपा सरकारच्या काळात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षात मोठा गैरव्यवहार झाला असून त्याची कसून चौकशी व्हावी, अशी मागणी महाविकास आघाडी सरकारमधील ज्येष्ठ मंत्री सुभाष देसाई यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. हे प्रकरण गंभीर असून याकडे आरोग्य मंत्र्यांनी लक्ष द्यावे असेही पत्रात मंत्री देसाई यांनी म्हटले आहे.

No comments