Breaking News

खाजगी रुग्णालयांनो जास्तीची फीस वसुली थांबवा अन्यथा आंदोलन-रिपाइं

बीड :  कोरोना महामारीमुळे सर्वांचीच आर्थिक घडी विस्कटली आहे. परिणामी सर्वसामान्य  माणसाला त्याची जास्त झळ पोहचली आहे.असे असताना मात्र शहरासह जिल्ह्यातील खाजगी रुग्णालये मात्र त्यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांकडून जास्तीची फीस वसुली करत आहेत. त्यामुळे खाजगी रुग्णालयांनी ही, जास्तीची फीस वसुली त्वरित थांबवावी. अन्यथा रुग्णालयांसमोर तीव्र आंदोलन केले जाईल. अशा मागणीचे निवेदन रिपाइं पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा  बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वखाली खाजगी रुग्णालये तसेच जिल्हा प्रशासनाला दिले आहे.दरम्यान रुग्णालयांनी  रुग्णांकडून वाजवी स्वरूपात फीस घ्यावी यासाठी रिपाइंचे  शहर अध्यक्ष अविनाश जोगदंड यांनी बीड शहरातील  प्रत्येक खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांना भेटून विनंतीवजा निवेदने सादर केली आहेत. 

        निवेदनात म्हटले आहे की, बीड शहरात अनेक नामवंत रुग्णालये आहेत. जिल्ह्यातील विविध आजाराने ग्रासलेले अथवा अतिदक्षता रुग्ण जेंव्हा रुग्णालयात उपचारासाठी येतात,  तेव्हा त्यांच्याकडून वाजवी स्वरूपात फीस न घेता अधिक स्वरूपात फीस घेतली जात आहे. ही बाब मानवी दृष्टीकोनातून अन्यायकारक आहे. एवढेच नाही तर उपचाराच्या नावाखाली विविध चाचण्या करून फीस उकळण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णालयांच्या या मनमानी फीस वसुलीच्या विरोधात  युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा  बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे स्वतः जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे रुग्णालयांनी रुग्णांकडून जास्तीची फीस वसूल करू नये अन्यथा लोकशाही मार्गाने संबंधित रुग्णालयासमोर तीव्र  आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपाइंचे अविनाश जोगदंड, अक्षय कांबळे, अण्णासाहेब सोनवणे, दीपक अरुण, भाऊसाहेब दळवी. चेतन चक्रे, गणेश वागमारे,  पप्पू वाघमारे, कपिल इनकर, रतन  वाघमारे, सनी जोगदंड यांच्यासह  रिपाइंच्या आदी कार्यकर्त्यांनी निवेदनात दिला आहे.
No comments