Breaking News

आ.संदिप क्षीरसागरांनी बीडमधील रखडलेल्या भुयारी गटार,अमृत पाणी पुरवठा योजना प्रश्नी उठवला आवाज


मच्छी मार्केट, भाजी मंडई इमारत खुली करण्याची मागणी
; प्रशासन लागले कामाला

बीड : बीड नगर परिषदेच्या हद्दीमध्ये अमृत अभियानांतर्गत बीड शहरासाठी पाणी पुरवठा व भुयारी गटार योजना मंजुर आहे. या दोन ही योजनेची मुदत संपुन गेली तरी काम अर्धवट अवस्थेत असल्याने याचा शहरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यात नवीन करावयाच्या विकास कामांवर या दोन्ही योजना अर्धवट अवस्थेत असल्याने परिणाम होत असून सदर दोनही योजना मार्गी लावण्यासाठी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी विधानसभेमध्ये आवाज उठवला. शहरातील फीश मार्केट, भाजी मंडई इमारत उभारूनही शेतकरी, व्यापारी, नागरीकांसाठी खुली केली जात नसल्याने ती तातडीने खुली करून वापरात आणावी यासह बीड मतदार संघाच्या विकासासाठी अधिकचा निधी देण्यात यावा अशी मागणी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी विधानसभेत केली आहे. आ.संदिप क्षीरसागर यांनी विधानसभेत आवाज उठवल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडून याबाबत तातडीने अहवाल सादर करून कार्यवाहीचे आदेश देण्यात आल्याने झोपलेले पालिका प्रशासन मात्र खडबडून जागे झाल्याचे दिसते.

बीड नगर परिषदेच्या हद्दीमध्ये अमृत अभियानांतर्गत बीड शहरासाठी पाणी पुरवठा योजना 114 कोटी 63 लाख रूपयांची मंजूर आहे. या योजने वर्क ऑर्डर जीवन प्राधिकरण यांनी दि.29.11.2017 रोजी दिलेली असून यात 24 महिन्यात काम करण्याची मुदत देण्यात आली होती. तर भुयारी गटार योजनेसाठी 165 कोटी 80 लाख रूपये मंजुर असून या योजनेची वर्क ऑर्डर जीवन प्राधिकरणने दि.19 जुलै 2018 दिलेली आहे. दोन्ही योजनेचे काम पुर्ण करण्याचा कालावधी संपुन गेला आहे. या दोनही योजनेचे काम अर्धवट अवस्थते पडलेले आहे. या दोन्ही योजनेच्या अर्धवट अवस्थेतील कामांमुळे शहरात नवीन विकास निधी आणण्यास मोठी अडचण होत आहे. आणलेला निधी शहरातील या दोन्ही योजनेचे कामे पुर्ण नसल्यामुळे खर्च करता येत नाही.

कामे सुरू करता येत नाहीत अशा अनेक बाबी समोर येत आहे. त्यात नगर पालिका, जीवन प्राधिकरण व संबंधित कंत्राटदार हे दोन्ही योजनेचे काम करत असतांना कसल्याही प्रकारची काळजी व सुरक्षा न बाळगता काम करत नसल्याने यात शहरातील दोन नागरिकांचा अपघाती मृत्यू झाला आहे. यास जबाबदार असणार्‍या संबंधित दोषींवर कार्यवाही करून सदर दोन्ही योजनेचे काम तातडीने पुर्ण करण्यासाठी चौकशी समिती नेमूण बीड शहराच्या विकासासाठी अधिकचा निधी देण्यात यावा अशी मागणी विधानसभेत आ.संदिप क्षीरसागर यांनी पुरवनी मागण्यांवर बोलतांना केली आहे. आ.संदिप क्षीरसागर यांनी बीड शहरातील रखडलेल्या भुयारी गटार पाणी पुरवठा योजनेच्या प्रश्नी विधानसभेच्या सभागृहात पुरवनी मागणीवर चर्चा करत असतांना आवाज उठवल्यानंतर विधानसभा अध्यक्ष यांच्या कार्यालयाकडून याबाबत तात्काळ माहिती सादर करून दोषींविरूद्ध कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहे. हे आदेश जिल्हा प्रशासनामार्फत नगर पालिकेत धडकल्यानंतर नगर पालिकेतील अधिकार्‍यांची चांगलीच धावपळ सुरू असल्याचे दिसून आले आहे.

मोडकळीस आलेल्या प्राथमिक शाळांच्या इमारतीसाठी मागितला वाढीव निधी
आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी विधानसभेच्या सभागृहात पुरवणी मागणीवर बोलत असतांना नगर विकास विभागाच्या चर्चेत सहभागी होत बीड शहरातील महत्त्वाचे विषय मांडले. या विषयानंतर आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या वर्गखोली इमारतीचा विषय मांडला. बीड मतदार संघात 400 पेक्षा अधिक प्राथमिक शाळा असून अनेक ठिकाणच्या शाळा उघड्यावर भरत आहेत तर काही ठिकाणच्या शाळा वर्गखोल्या नसल्याने उघड्यावर भरत आहेत. माझ्या मतदार संघातील विद्यार्थ्यांना वर्ग खोलीत बसून चांगले शिक्षण घेता यावे यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या वर्गखोली इमारतीसाठी अधिकचा निधी देण्यात यावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. 
No comments