Breaking News

केज येथील मग्रारोहयो प्रकरणी आता ग्रामसेवक संघटना आंदोलनाच्या पवितत्र्यात


न्याय न मिळाल्यास महिला दिनी ग्रामसेवक करणार असहकार आंदोलन

चौकशी अहवालात अनेक त्रुटी असल्याचा ग्रामसेवक संघटनेचा आरोप

गौतम बचुटे । केज 

केज तालुक्यात मनरेगा योजनेच्या कामातील कथित भ्रष्टाचार आणि अनियमितते बाबत झालेल्या चौकशी नुसार बजवण्यात आलेल्या नोटिसा संदर्भात आता ग्रामसेवक संघटना आक्रमक झाली असून जर त्यांना न्याय मिळाला नाही; तर असहकार आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामसेवक संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या पत्रात केला आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज  केज तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये झालेल्या अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या बाबतीत दिनांक २५ सप्टेंबर २०२०, ३० डिसेंबर २०२० आणि १० फेब्रुवारी २०२१ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांनी सरपंच ग्रामसेवक,  ग्रामरोजगार सेवक व तसेच इतर पदाधिकारी यांना नोटीस बजावल्या आहेत. त्या संदर्भात महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन यांचे जिल्हाध्यक्ष बळीराम उबाळे व सरचिटणीस भगवान तिडके यांनी एका पत्राद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळविले आहे की, जर ग्रामसेवकांना योग्य न्याय मिळाला नाही तर येत्या  ८ मार्च या महिला दिना पासून असहकार आंदोलन करण्यात येणार आहे. या पत्रात त्यांनी कार्यरत ग्रामसेवका ऐवजी  ग्रामसेवक त्याचा तपास आदेश नसतानाही औरंगपूर, बावची, भालगाव, भाटुंबा, केकतसारणी, दरडवाडी, धर्मशाळा, गप्पेवाडी, हनुमंत पिंप्री, इस्थळ, जिवाचीवाडी कोल्हेवाडी, मांगवडगाव, मोटेगाव, नायगाव, पाथ्रा, पिसेगाव, राजेगाव, पिसेगाव, राजेगाव, सासुरा, सिंदी, शिरपूरा, सोनेसांगवी, सौंदना या चोवीस गावांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच आनंदगाव, वाघेबाभूळगाव, सारणी (सां), आवसगाव, उंदरी या पाच गावांमध्ये शून्य रकमेचा अपहार झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. 

त्याच बरोबर एकुरका, नांदुरघाट, दरडवाडी, घाटेवाडी, उमरी, साबला, पिट्टीघाट, रामेश्वरवाडी, बोरीसावरगाव, पिंपळगव्हाण, आरणगाव, बानेगाव, येवता, काशीदवाडी, धनेगाव, कोठी, कोरडेवाडी या सतरा गावात जलसिंचन विहिरी, शोषखड्डे, वृक्षलागवड या बाबत ऑनलाइन झालेला खर्च हा कमी असून देखील संशयित अपहार व नोटीसचे बिल यावर खर्च हा वेगळा दाखविण्यात आला असून ऑनलाइन झालेला खर्च कमी आणि संशयित अपहार त्यापेक्षा जास्त झाल्याचे नमूद केले आहे. कासारी ग्रामपंचायतीचा खर्च शून्य असतानाही अपहार मात्र ३४२७२ रु. असा दिलेला आहे. होळ येथील जलसिंचन विहिरीचे मापन पुस्तिका चौकशी पथकाला सादर करूनही त्यांनी उपलब्ध नसल्याचा चूकीचा अहवाल दिल्यामुळे ४४८७३२२ रु. चा संशयित अपहार झाल्याचे नमूद केले आहे.

सार्वजनिक विहिरींच्या चौकशीचे आदेश नसताना त्यांनी कानडी बदन, सादोळा, साळेगाव आणि पिंपळगाव येथे चौकशी केली असून सदर विहिरी या बुडीत क्षेत्रात आहेत. नायगाव,  मोटेगाव, मुलेगाव, इस्थळ, हनुमंत पिंप्री येथील चौकशी आदेश नसतानाही त्यांना नोटीस बजावली आहे. सारणी (सां) येथील ग्रामपंचायतीने शोषखड्डे यांची मागणी केली नसताना तसेच प्रशासकीय व तांत्रिक मान्यता नसतानाही नरेगा कक्षातील अधिकारी व कर्मचारी यांनी संगनमत करून ऑनलाईन प्रणालीद्वारे खोटे व बनावट वर्क कोड तयार करून परस्पर रकमेचा अपहार केला आहे.

२०१५ ते २०२१ या कालावधीतील फेटाळण्यात आलेली देयके नरेगा कक्षाने मजुरांच्या खात्यावर वर्ग न करता बोगस मजुरांच्या नावावर वर्ग केले आहेत. अशा प्रकारे परस्पर निधी वर्ग करणारी यंत्रणा पंचायत समितीच्या नरेगा कक्षातील अधिकारी व कर्मचारी यांचे मोठे स्कॅडल आहे. सदर अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रताप समजताच त्यांना तात्पुरत्या स्वरूपात कामावरून कमी करून पुन्हा त्यांना दुसऱ्या तालुक्यात नियुक्ती दिल्या आहेत. यात अधिकारी व कर्मचारी यांची यंत्रणा असून नाहक ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक व सरपंच यांना गोवण्यात आले आहे.

कामांच्या प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता, हजेरी पत्रके, मूल्यांकन आणि देयकांच्या बाबतीत ग्रामसेवक जबाबदार नसतानाही प्रदाने अदा केल्यानंतर मूळ हजेरी पत्रक, मोजमापन पुस्तिका, बिलाच्या प्रती, ई कागदपत्रे ग्रामपंचायतीला परत दिले नाहीत.

सदर चौकशी अहवाल हा चुकीचा आणि खोटा असल्याने तालुक्यातील ग्रामसेवकांना न्याय देण्याची मागणी जिल्हाध्यक्ष बळीराम उबाळे आणि सचिव भगवानराव तिडके यांनी केली आहे. तसेच जर न्याय मिळाला नाहीतर केज तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतीचे सर्व ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे ८ मार्च या महिला दिना पासून असहकार आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.  
No comments