Breaking News

अवकाळीचा फटका, गहू, ज्वारी, हरभरा पिकांचे नुकसान, शेतकरी चिंतेत तात्काळ नुकसानभरपाई द्या : सुरेखा जाधव

बीड :  बीड जिल्ह्यासह राज्यात गत तीन दिवसापासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. या अवकाळी पावसाचा पिंपळनेर परिसरात गहू, हरभरा, ज्वारी या प्रमुख पिकांसह इतर पिकांना फटका बसला असून शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. या नुकसानीकडे शासन आणि प्रशासन लक्ष देणार का असा सवाल शेतकरी करित आहेत.

बीड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांची पंचनामा करून तात्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे परिसरात गत तीन ते चार दिवसापासून ढगाळ वातावरण तयार होत असून वाऱ्या सह अवकाळी पावसाची सुरुवात होत आहे, या पावसाने फायदा कमी आणि नुकसान अधिक होत आहे, सध्या उभा असलेली ज्वारी, काढणीला आलेला गहू, हरभरा पिके जमीनीवर झोपली आहेत, तर काढलेला गहू, ज्वारी आणि हरभरा भिजला आहे. वाऱ्यामुळे पिकांचे नुकसान झाले, जमीनीवर झोपलेल्या गहू, ज्वारी पिकाला माती चिटकली असून काढलेल्या ज्वारी, गहू पिकांची ही हिच अवस्था झाली आहे, हरभरा पिकाचे घाटे वाऱ्या व पावसामुळे झडले असून या अवकाळी पावसाचा बागायतदार शेतकऱ्यांना अधिक फटका बसल्याचे चित्र दिसून येते आहे. ढगाळ वातावरण आणि वाऱ्यासह पाऊस तीन चार दिवसापासून येत असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई देण्यासाठी शासन याकडे लक्ष देणार का असा सवाल उपस्थित होत आहे.

आंबा उत्पादक अडचणीत 

पिंपळनेर आणि परिसरात आंबा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, तसेच अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्या गावरान आंब्यांच्या झाडांची संख्या अधिक आहे, मात्र गत चार ते पाच वर्षापासून दुष्काळामुळे न बहरलेला आंबा यावर्षी पाऊस बरा झाल्यामुळे बहरला होता. परंतु या अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे झाडाला लागलेल्या फळांची मोठ्या प्रमाणात गळती झाली आहे, यामुळे हा शेतकरी अडचणीत आला आहे.

चाऱ्याचे नुकसान 

शेतकऱ्यांनी पाळी प्राण्यांसाठी सध्या चाऱ्याची जुळवा जुळव सुरु केली आहे, मात्र अवकाळीने मका पिकाचे नुकसान झाले. तसेच कडबाही अनेक शेतकऱ्यांचा भिजला आहे. तर खळे सुरु असलेल्या शेतकऱ्यांची मोठी धांदलं उडाली त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा जाधव यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
No comments