Breaking News

शासकीय कर्मचाऱ्यांनी स्वतःची कोरोना तपासणी करा अन्यथा गुन्हा दाखल होणार


जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना आदेश

गौतम बचुटे । केज 

बीड जिल्ह्यात कोविड संक्रमित संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच जिल्हयातील शासकीय कार्यालयातील काही अधिकारी, कर्मचारी हे कोविड संक्रमित येत असल्याचे निदर्शानास येत आहे. अशा कोविड संक्रमित अधिकारी, कर्मचारी यांचे पासुन इतरांना कोविड संक्रमित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यावर उपाय योजना म्हणून सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी खालील प्रमाणे दर्शविण्यात आलेल्या दिनांका पुर्वी किंवा दिनांका रोजी अँटिजेन, आरटीपीसीआर  तपासणी करुन घ्यावी. असे निर्देश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दिले आहेत. 

महसूल विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी दिनांक २३ मार्च २०२१ रोजी. पोलिस विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी दिनांक २४ मार्च २०२१ रोजी. जिल्हा परिषद विभागाच्या अधिनस्त सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी दिनांक २५ व २६ मार्च २०२१ रोजी. मा. न्यायालयातील सर्व न्यायीक अधिकारी, कर्मचारी यांनी दिनांक २७ मार्च २०२१ रोजी आणि जिल्हयातील सर्व विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी दिनांक २८ व २९ मार्च २०२१ रोजी अँन्टीजन, आरटीपीसीआर तपासणी करुन घ्यावी. 

तपासणीसाठी दर्शविण्यात आलेल्या दिनांकानंतर कार्यालयात येणारे कोणतेही अधिकारी, कर्मचारी हे अँन्टीजन, आरटीपीसीआर तपासणी न करता कार्यालयात उपस्थित राहणार नाहीत; याची कार्यालय प्रमुख यांनी दक्षता घ्यावी.  आदेशाचे पालन न करता उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांनी साथरोग प्रतिबंध कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच भारतीय दंड संहिता १८६० नुसार गुन्हा केला असे मानन्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल. 

राज्य शासनाने कोरोना विषाणूचा ( कोविड -१९ ) प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग अधिनियम १८९७ दि . १३-३-२०२० पासून लागू करुन खंड २, ३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रात कोविड -१९ नियत्रंण आणण्यासाठी व त्याचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्या लागू करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणुन घोषित करण्यात आलेले आहे . कोरोना विषाणूचे ( कोविड -१९ ) उद्भवणा - या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियत्रंण यासाठी महाराष्ट्र कोविङ -१९, उपाययोजना नियम २०२० यातील नियम ३ नुसार सक्षम प्राधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांना घोषित केलेले आहे आणि त्यांना कार्यक्षेत्रातील कोविड -१९ वर नियत्रंण आणण्यासाठी व त्याचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी ते सक्षम असतील.
No comments