Breaking News

'त्या' रुग्णांची गैरसोय होत असल्याचे समजताच वाल्मिकअण्णा कराड कोविड केअर सेंटरमध्ये !


धनंजय मुंडेंच्या कॉल सेंटरचा कॉल आणि रुग्णांच्या तक्रारींचे चोवीस तासाच्या आत निवारण

परळी  : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या कोरोना हेल्प सेंटर द्वारे परळी येथील रुग्णांची विचारपूस करत असताना आयटीआय कॉलेज परळी, येथील कोविड केअर सेन्टर मधील रुग्णांनी अंघोळीसाठी गरम पाणी नाही, जनरेटर नसल्यामुळे गैरसोय, डॉक्टरांनी विशेष लक्ष द्यावे आदी तक्रारी कॉल सेंटर प्रतिनिधी कडे मांडल्या होत्या. याबाबत माहिती मिळताच न.प. गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांनी या सेंटर ला भेट देऊन या अडचणींचे निवारण केले आहे. 

पालकमंत्री धनंजय मुंडे हे कोविड -१९ उपचारार्थ रुग्णालयात दाखल असले तरी बीड जिल्हा व परळी या त्यांच्या मतदारसंघावर त्यांचे बारकाईने लक्ष असते; याचीच प्रचिती आज पुन्हा एकदा आली! धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातून परळीतील कोविड पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची विचारपूस करत असताना, अंघोळीसाठी गरम पाणी नाही, सोलार नादुरुस्त आहे, जनरेटर नाही आदी समस्या समोर आल्या होत्या.

याबाबत माहिती कळविली असता नगर परिषद गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांनी तातडीने आयटीआय येथील कोविड केअर सेंटर ला भेट दिली. आरोग्य अधिकारी, तहसीलदार यांना तेथे बोलावून तेथील अपुरी व्यवस्था व अन्य समस्यांची माहिती घेतली व तात्काळ मा. जिल्हाधिकारी तसेच मा. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे याबाबत विनंती केली. 

जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी या कोविड केअर सेंटर ला नवीन जनरेटर उपलब्ध करून देणे, तसेच येथील सोलार यंत्रणा दुरुस्त करून कार्यान्वित करणेबाबत संबंधितांना निर्देशित केले असून रुग्णांच्या तक्रारीची दखल घेत २४ तासांच्या आत समस्या सोडविल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. वाल्मिक अण्णा कराड यांच्यासह, परळीचे तहसीलदार सुरेश शेजुळ, नायब तहसीलदार रुपनर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अर्षद शेख यांसह आदी यावेळी उपस्थित होते. 

असे चालते कोरोना हेल्प सेंटर...

धनंजय मुंडे यांच्या कार्यालयामार्फत कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या काळापासून 'कोरोना हेल्प सेंटर' हे डिजिटल कॉल सेंटर स्वतः धनंजय मुंडे यांच्या देखरेखीत चालवले जात असून, याद्वारे कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची विचारपूस करून त्यांना आवश्यक मदत केली जाते. मागील एक वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून, याद्वारे रुग्णांना बेड उपलब्ध करणे, डॉक्टरांशी बोलून अडचणी सोडवणे, ते अगदी खाजगी रुग्णालयात बिलात सवलत मिळवून देण्यापर्यंत मदत केली जाते. या कॉल सेंटर द्वारे परळी मतदारसंघातच नव्हे तर बीड जिल्हा व जिल्ह्याबाहेरील रुग्णांना देखील मदत करण्यात येते.
No comments