Breaking News

वैद्यनाथ बँकेची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने संपन्न - चेअरमन अशोक जैन


परळी : येथील  वैद्यनाथ अर्बन को.ऑप.बँक लि .परळी वैजनाथ या बँकेची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा महाराष्ट्र शासनाने कोवीड -१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बँकेचे चेअरमन अशोकजी जैन यांच्या अध्यक्षतेखाली व जेष्ठ संचालक  विकासराव डुबे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनोदजी खर्चे यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने शनिवारी (दि.२७) यशस्वीरित्या संपन्न झाली. कोविड-१९ महामारीच्या संकटामुळे प्रथमच बँकेची सभा ऑनलाईन पद्धतीने पार पडत असताना या ऑनलाईन सभेस सर्व उपस्थित सभासदांनी चांगला प्रतिसाद देऊन सभा यशस्वी केली.

सभेच्या सुरवातीस बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनोद खर्चे यांनी ५५ व्या वार्षिक सर्वसाधारण ऑनलाईन सभेसाठी उपस्थित बँकेचे मा.चेअरमन , व्हाईस चेअरमन , सर्व संचालक मंडळ व बँकेचे सर्व सभासदांचे शब्दसुमनांनी स्वागत केले.तसेच सभेची सुरुवात वैद्यनाथ प्रभु , देवि लक्ष्मी - सरस्वती , श्री गणेश तसेच बँकेचे श्रध्दास्थान लोकनेते गोपिनाथराव मुंडे यांचे स्मरण करून केली. या नंतर गत वार्षिक सभेपासून आजपर्यंतच्या कालावधीत बँकेचे जे सभासद , खातेदार दिवंगत झाले . कोरोना संसर्गामुळे जे दिवंगत झाले , तसेच भारतातील राजकीय , सामाजिक , सहकार , कला व साहित्य क्षेत्रातील व्यक्ती बँकेचे ज्ञात - अज्ञात सभासद , हितचिंतक , ठेवीदार , खातेदार , पंचतत्वात विलीन झाले , देशाचे रक्षण करताना शहीद झालेले वीर जवान , या सर्वांच्या कुटूंबियांच्या दुःखात वैद्यनाथ बँक परिवार सहभागी आहे . परमेश्वर या सर्वांच्या आत्म्यास शांती देवो अशी प्रार्थना करून भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली.या नंतर सभेच्या नोटिस चे वाचन केले व मा.अध्यक्षाना सभेची सूत्रे स्विकारण्याची विनंती केली.

मा.अध्यक्षांनी सभेची सूत्रे स्विकारल्या नंतर त्यांच्या भाषणात बोलतांना बँकेचे श्रध्दास्थान स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या स्वप्नातील वैद्यनाथ बँक साकारण्यासाठी मा.सौ.पंकजाताई पालवे - मुंडे , माजी मंत्री , महाराष्ट्र राज्य तसेच मा.खा.डॉ.प्रितमताई गोपीनाथराव मुंडे , खासदार बीड लोकसभा यांच्या मार्गदर्शनाखाली अहवाल सालात संचालक मंडळाने यशस्वीपणे कामकाज पुर्ण करुन बँकेला प्रगतीपथावर नेले आहे . आर्थिक वर्ष अखेर बँकेच्या ठेवी रू.९ ७० कोटी २० लाख, कर्जे रू .५८७ कोटी ५५ लाख, केलेली गुंतवणूक रू .४०१ कोटी ८५ लाख तर बँकेला रु. ४ कोटी २३ लाखाचा नफा झालेला आहे. चालू आर्थिक वर्षात १५७८ कोटी चा व्यवहार पुर्ण करुन बँक २००० कोटीच्या व्यवसायाकडे वाटचाल करीत आहे . तसेच आर्थिक बाबींचा विचार करताना आपण ज्या समाजात वावरतो त्या समाजाचेही ऋण काही अंशी फेडता यावे यासाठी बँक सतत अग्रेसर आहे . 

कोवीड -१ ९ कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत मा.तहसीलदार साहेब परळी - वैजनाथ यांची पुर्व परवानगी घेऊन सर्व संचालक / सदस्य व कर्मचारी यांच्यावतीने गोर - गरिब जनतेसाठी महाराष्ट्र शासन चिफ मिनिस्टर रिलीफ फंड मध्ये रु .३ लाख आर्थिक मदत , उपजिल्हा रुग्णालय परळी - वैजनाथ येथील कोरोना रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर्स , नर्स व ब्रदर्स यांचेसाठी पी.पी.ई.कीट , मास्क , सॅनिटायझर इत्यादीची मदत करण्यात आली.अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट परळी वैजनाथ यांच्या मार्फत बँकने लॉकडाऊनच्या काळात गरजवंत लोकासाठी भोजनाची व्यवस्था केली . आणि बँक कर्मचाऱ्यांच्यावतीने एक दिवसाचे पुर्ण वेतन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला देऊन सामाजीक उपक्रमात सहभाग नोंदवलेला असल्याचे सांगितले.आणि सर्व विषयानुरूप ठराव सभेसमोर मांडले.सभेच्या शेवटी जेष्ठ संचालक मा.श्री विकासराव डुबे यांनी या ऑनलाईन सभेस सभासदांनी भरघोस प्रतिसाद देऊन सभा यशस्वी केल्याबद्दल सभासदांचे, तसेच सर्व सहकारी संचालक यांचे व बँकेचे कर्मचारी यांचे आभार मानले.

No comments