Breaking News

निराधार योजनांसाठी डिसेंबर २०२० अखेरपर्यंतच्या देयकांपोटी ४७४३ कोटी रुपये वितरित - धनंजय मुंडे


जानेवारी पासूनची देयके वितरित करण्यास सुरुवात
; भत्ते वाढवण्यासाठी केंद्रानेही कृपादृष्टी दाखवावी - मुंडेंनी काढला चिमटा

मुंबई  : संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ, दिव्यांग निवृत्ती वेतन, विधवा निवृत्ती वेतन, राष्ट्रीय वृद्धापकाळ आदी योजनेतील राज्यातील संपूर्ण लाभार्थींना डिसेंबर २०२० अखेरपर्यंतचे संपूर्ण अनुदान वितरित करण्यात आले असून, यासाठी ४७४३ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत बोलताना दिली. 

आ. भाई गिरकर, विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लातूर जिल्ह्यातील काही तालुक्यात नोव्हेंबर २०२० पासूनची अनुदान देयके थकित असल्याचा आरोप करत विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देत सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी लातूर सह राज्यातील अन्य सर्वच जिल्ह्यात या सर्व योजनेतील लाभार्थींना डिसेंबर अखेरपर्यंतचे संपूर्ण अनुदान वितरित केले असल्याची माहिती दिली.

यावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रश्न उपस्थित करत, काही जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबर पासूनचे अनुदान थकित असल्याचा पुन्हा आरोप करताच, ना. धनंजय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यातील तालुका व योजनानिहाय वितरित करण्यात आलेल्या अनुदानाची आकडेवारी सभागृहात सादर केली. तसेच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विशेष सहाय्य योजनांच्या अंतर्गत वितरित करण्यात आलेल्या निधीचे विवरण सभागृहाच्या पटलावर ठेवले. दरम्यान संजय गांधी निराधारसह अन्य सर्वच योजनांच्या लाभार्थींना जानेवारी २०२१ पासूनच्या अनुदानाची वितरण प्रक्रिया राज्य शासन स्तरावर सुरू असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले.

अनुदानाची रक्कम वाढवायची असेल तर केंद्रानेही कृपादृष्टी दाखवावी

वि.प. नेते प्रवीण दरेकर व आ. भाई गिरकर यांनी संजय गांधी निराधार व अन्य योजनेतील लाभार्थींना केवळ एक हजार रुपये निर्वाह भत्ता देण्यात येतो, हा भत्ता वाढविण्याची गरज असल्याचे यावेळी म्हटले.

या योजनांमधील अनुदानाची किंवा भत्त्याची रक्कम वाढविण्याची मागणी राज्य शासनाकडे प्राप्त नाही; केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये ७०% व काही योजनांमध्ये त्यापेक्षाही जास्त वाटा राज्य शासन उचलते. त्यातच केंद्राच्या कृपेने आता पेट्रोल, डिझेल, गॅस आदी अनेक बाबींमध्ये महागाई प्रचंड वाढत आहे, त्यामुळे सदर योजनांमधील भत्ता व अनुदान वाढविण्यासाठी आता केंद्रानेच कृपादृष्टी दाखवावी असा चिमटा धनंजय मुंडे यांनी बोलताना काढला. 

No comments