Breaking News

छत्रपती संभाजीराजे यांचे दिल्लीवर भगवा फडकविण्याचे स्वप्न होते - ज्ञानदेव काशीद


छत्रपतींचे विचार आत्मसात करा-रमेश पोकळे

बीड :  छत्रपती संभाजी महाराज शूरवीर होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा देशातील विविध राज्यात फडकविण्यात त्यांचे भरीव योगदान होते. एवढेच नव्हे तर दिल्लीवर भगवा फडकविण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. संभाजीराजांवर द्वेष करणाऱ्या इतिहासकारांनी चुकीचा इतिहास लिहिला. यामुळे संभाजीराजे यांचे कर्तृत्व प्रकाश झोतात येऊ शकले नाही असे मत प्रसिद्ध व्याख्याते ज्ञानदेव काशीद यांनी व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेशभाऊ पोकळे यांनी छत्रपतींचे विचार आत्मसात करावे असे आवाहन केले.

बीड येथील संभाजी राजे ग्रंथालय व व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयात छत्रपती संभाजी राजे महाराज यांच्या स्वाभिमानी बलिदान दिनानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानात ज्ञानदेव काशीद हे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष रमेशभाऊ पोकळे होते तर व्यासपीठावर संस्था सचिव प्रा.गणेश पोकळे.प्रा.डॉ.राजेश भुसारी, वाघेरकर सर , शिवक्रांती संघटना संस्थापक अध्यक्ष गणेशजी बजगुडे, अशोकदादा रसाळ, प्रशासकीय अधिकारी संतोष सावंत,प्राचार्य डॉ.नामदेव सानप उपस्थित होते. पुढे बोलताना ज्ञानदेव काशीद म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांची जशी जडण-घडण राजमाता जिजाऊंनी केली तशीच छत्रपती संभाजी राजे यांची केली. छत्रपती संभाजीराजे यांचे व्यक्तिमत्व स्वाभिमानी होते. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यात  त्यांनी मोठे योगदान दिले. शूरवीर असणाऱ्या संभाजीराजेंनी दिल्लीवर भगवा फडकविण्याचे स्वप्न पाहिले होते, परंतु फितूरांनी त्यांचा घात केला. पूर्व दूषित इतिहासकाराने संभाजी राजांचा इतिहास चुकीचा लिहिला. त्यांचे कर्तुत्व प्रकाश झोतात येऊ दिले नाही.संभाजीराजे यांचे विचार प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारे आहेत असेही ते म्हटले. 

कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना रमेशभाऊ पोकळे म्हणाले की, छत्रपतींचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. छत्रपतींना त्रास देणाऱ्या औरंगजेबाचे नाव आजही महाराष्ट्र राज्यात घेतले जाते हे दुर्दैवी आहे. संभाजीराजे शूरवीर होते कर्तबगार होते असेही रमेशभाऊ यांनी म्हटले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजीराजे आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.बप्पासाहेब हावळे यांनी केले तर प्रास्ताविक प्रा.गणेश पोकळे यांनी केले. शेवटी प्रा.विजय दहिवाळ यांनी आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित असून ऑनलाइन च्या माध्यमातून बहुसंख्य धर्मवीर संभाजी राजे प्रेमी यांनी आपली उपस्थिती दर्शवली.
No comments